नवीन पाटील,सफाळे,
गीता हे आदर्श जीवन जगण्याचे मार्गदर्शक मेन्यूएल आहे – सनद कुमार प्रभू,
मानवी जीवन जगताना असंख्य अडचणी येत असतात.प्रत्येक प्रसंगाला धीराने समोर जाण्यासाठी ‘गीता,’ हे दीपस्तंभाप्रमाणे काम करत असून ‘गीता,’ हे आदर्श जीवन जगण्याचे मार्गदर्शक मेन्यूएल आहे,असं मत गोवर्धन ग्रामीण विकास कार्याध्यक्ष सनद कुमार प्रभू यांनी व्यक्त केलं.गोवर्धन इको व्हिलेज संस्थेतर्फे १२ जाने.रोजी गालतरे वाडा येथे ग्रामीण शिक्षण विभाग अंतर्गत गीता प्रज्ञा शोध स्पर्धा व विज्ञान प्रज्ञा शोध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला,त्यावेळी ते बोलत होते.
विज्ञान आणि अध्यात्म हे विरोधी नसून एकमेकांना परस्पर पूरक आहेत.बुद्धीच्या बळावर विज्ञान विकास आणि प्रगती साधता येते,परंतु त्याला अध्यात्माची जोड असेल तर तो विकास विनाशाकडे न जाता शाश्वत पद्धतीने होतो. जीवनातील प्रत्येक प्रश्नांचे उत्तर गीतेत सापडते.गीता आत्मसंयम,एकाग्रता,जिद्द, सकारात्मक विचार,कष्टासाठी लागणार बळ,अपयश पचवण्याची आणि आव्हानांना समोर जाण्याची क्षमता निर्माण करते.त्यामुळे गीतेचा प्रचार व प्रसार करणं ही काळाची गरज आहे,हे ओळखून २०१२ पासून माधव गोपाळ प्रभू यांच्या संकल्पनेने ‘गीता प्रज्ञा शोध स्पर्धेला’ सुरुवात झाली,असे त्यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात सांगितले.
विज्ञानाच्या युगात बुद्धीसोबत विवेक ही मुलांमध्ये रुजायला हवा तसेच उत्तम चारित्र्य घडण्यासाठी त्यांच्यावर लहान वयातच संस्कार होणंही आवश्यक आहे.ही दूरदृष्टी ठेवून २००४ साली वाडा येथे या संस्थेच्या उभारणीला सुरुवात केली आहॆ.
या कार्यक्रमास गोवर्धन ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष सनद कुमार प्रभू, गीता प्रज्ञेचे जनक माधव प्रभू, प्रायोजक जिग्नेश भाई देसाई, पत्नी अरुंधती देसाई, आर.एस.एस.नवसारी सदस्य कांतीभाई पचोटिया,ग्रामीण शिक्षण विभाग प्रमुख निताई चैतन्य दास आदी मान्यवर उपस्थित होते. बक्षीस समारंभ सोहळ्यास वाडा, डहाणू,विक्रमगड,मनोर, पालघर,बोईसर आदी विविध शाळेतील विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
२०२४- २५ आयोजित ” गीता प्रज्ञा शोध स्पर्धा,” या परीक्षेत पालघर जिल्ह्यातील एकूण ८४ शाळेतील ६ हजार २०० विद्यार्थी सहभागी झाले होते तर,५० शाळेतील २०० शिक्षकांनी देखील गीता प्रज्ञा परीक्षा स्पर्धेत भाग घेतला होता.तसेच विज्ञान प्रज्ञा शोध स्पर्धा परीक्षेत ६८ शाळेतील ४ हजार ३०० विद्यार्थी सहभागी झाले होते.गोवर्धन ग्रामीण विकास या संस्थेमार्फत ग्रामीण शेती,शिक्षण,तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले जाते.यावेळी बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, प्रमाणचिन्ह,शालेयउपयोगी वस्तू, रोख रक्कम व पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
बॉक्स कोट…२
तारापूर विद्यामंदिर, बोईसर शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘गीता प्रज्ञा शोध परीक्षेत’ पुढील प्रमाणे क्रमांक पटकावले…
१.) लावण्या मेस्त्री – प्रथम क्रमांक २.)संस्कृती कोठारी – द्वितीय क्रमांक ३.)आरुषी पाटील- तृतीय क्रमांक ४.) शिवम मिश्रा- चौथा क्रमांक ५.) दिवीजा पाटील – पाचवा क्रमांक
गीता प्रज्ञा शोध स्पर्धा परीक्षेत पालघर जिल्ह्यातून निवडून आलेले विजेते…
१) विपुल कृष्णा बेडगा- आश्रम शाळा मासवण- क्रमांक १ ला
२) निधी विनोद पाटील- आलंचंदावरकर विद्यालय- खानिवली- क्रमांक- २ रा
३) कृष्णाई सुनील पाटील– बाळ कृष्ण यादव- असनस हायस्कूल – क्रमांक ३ रा

