जव्हार प्रतिनिधी
जव्हार येथे शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न,
तालुका कृषी विभाग व ग्रामपंचायत सारसून यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात साजरा झाला.या मेळाव्यात शेतकऱ्यांनी फळबाग आणि भाजीपाला लागवडीवर विशेष भर देत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा,असा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन विक्रमगड मतदार संघाचे आ.हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.यावेळी त्यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांना पाणी साठवण व सिंचन योजनेच्या माध्यमातून शासनाकडून पुरवले जाणारे लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच सारसून ग्रामपंचायत आदर्श गाव म्हणून सलग पाच वर्षे शासनाच्या विविध योजना राबवण्याचे घोषित केले. भाजीपाला आणि फळपिके यांची व्यवस्थित ग्रेडिंग व पॅकिंग करून विक्रीतून अधिक उत्पन्न मिळवण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
महिला बचत गट आणि सूक्ष्म उद्योगांना प्रोत्साहन
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत महिला बचत गट तयार करून शेतकऱ्यांनी विविध उद्योग सुरू करावेत,यासाठी डी.आर.पी.पालघरचे गणेश कनगरे यांनी महिला वर्गाला विशेष मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा सदस्य सुरेखाताई थेतले,पंचायत समिती जव्हार सभापती विजया लहारे,सरपंच काकडी जंगली,माजी सभापती तुळशीराम मोरघा,ग्रामदान मंडळ जामसर सरपंच विठ्ठल थेतले,माजी ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर भुसारे,ग्रामीण आदिवासी सेवासंस्थेचे अध्यक्ष यशवंत देशमुख,वाळवंडा सोसायटीचे चेअरमन दयानंद लहारे,उपविभागीय कृषी अधिकारी राहुल जितकर, तालुका कृषी अधिकारी जयराम आढळ व कृषी विज्ञान केंद्र कोसबाड येथील शास्त्रज्ञ उत्तम सहाने यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.मेळाव्यात भाजीपाला लागवड,फळझाडे,कीड व्यवस्थापन,मधुमक्षिका पालन,कांदा लागवड,तसेच फुल पिकांवरील कीड नियंत्रण याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.याशिवाय शेतकरी प्रगतीसाठी विविध योजनांचा लाभ घेण्याचा सल्ला दिला.सदर शेतकरी मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत सारसून,तालुका कृषी अधिकारी कार्यालय,तसेच विजय मुकणे ( सहाय्यक अधीक्षक ), अनिल डाबेराव ( मंडळ कृषी अधिकारी ), जयेश बोर्डे, ईश्वर उदमले (कृषी पर्यवेक्षक), अतुल गवळी (कृषी सहाय्यक) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.कार्यक्रमाची सुरुवात आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी जयराम आढळ यांनी केले.शेतकऱ्यांनी या मेळाव्याद्वारे शासनाच्या विविध योजनांची माहिती घेत लाभ मिळवण्याचा संकल्प केला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ, शेतकरी,कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

