वसंत भोईर,वाडा,
१३ जाने. रोजी श्रमजीवी संघटना,कोका कोला कंपनीला देणार धडक,
तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायत हद्दीतील कोकाकोला कंपनीला वैतरणा नदीवरील गांध्रे बंधाऱ्यातून पाणीपुरवठा करण्यात येतो. या नदी किना-यावर असलेल्या अनेक गावांना मार्च महिन्यांपासून पाणीटंचाई जाणवत असताना कंपनीला दिले जाणारे पाणी बंद करण्याची मागणी करण्यात येत आहॆ.मात्र प्रशासन त्याकडे गांभीर्याने बघत नसल्याने श्रमजीवी संघटना येत्या १३ जाने.रोजी कोकाकोला कंपनीवर धडक देणार आहॆ. यासंदर्भात संघटनेने प्रशासनाला इशारेवजा निवेदन दिले आहॆ.
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो.पण शेतीसाठी पुरेशी सिंचन व्यवस्था नसल्याने पावसाळी पाणी समुद्रात वाहून जाते.गांध्रे गावानजीक वैतरणा नदीवर कोल्हापूरी टाईपचा बंधारा बांधला आहे.१९७७ साली बांधलेल्या या बंधाऱ्याची साठवण क्षमता २ दशलक्ष घ.मी.इतकी असून २८५ हेक्टर क्षेत्र उपसा जलसिंचनाद्वारे प्रस्तावित आहे.परंतु सद्यस्थितीत या बंधाऱ्यावरील प्रतिवर्षी केवळ ९० हेक्टर क्षेत्र सिंचन होत आहे.
तसेच याच बंधाऱ्यातील पाणी जलजीवन मिशन अंतर्गत आबिटघर व इतर १७ गावांना देण्यात येणार आहे.तसेच गांध्रे कुडूस दरम्यान असलेली गावे,वाडा नगरपंचायत क्षेत्र,मालोंडे,सारशी,तुसे व नदीपात्रालगत असलेल्या गावांना घरघर जल अंतर्गत नळपाणी योजनेच्या माध्यमातून हेच पाणी प्रस्तावित आहे.सद्यस्थितीत या गावांना पाणी पुरवठा करण्याच्या क्षमतेबाबत शंका आहे,म्हणून शासनाने पाण्याचे नियोजन करतांना प्रथम पिण्यासाठी पाणी,नंतर शेतीला पाणी व उर्वरित पाणी औद्योगिक क्षेत्राला देण्यात यावे,अशी मागणी होत आहॆ.
वैतरणा नदीवरील गांध्रे येथील कोकण टाईप बंधाऱ्यातून कोकाकोला कंपनीला पाणी पुरवठा केला जातो.कंपनी प्रतिवर्षी ६१० दशलक्ष लिटर पाणी या बंधाऱ्यातून उचलते व पाटबंधारे विभागाला १६.५० पैसे दराने शुल्क जमा करते.सद्यस्थितीत कोकाकोला कंपनीला देण्यात येणारे पाणी तात्काळ थांबवावे व पाणीटंचाई असणाऱ्या गावांना जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनांना पुरेसे पाणी द्यावे.या मागणीसाठी येत्या १३ जाने.रोजी कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजारो महिला धडक देणार असल्याचा इशारा श्रमजीवी संघटनेच्या पालघर उपजिल्हाप्रमुख रेखा प-हाड,तालुका महिला प्रमुख ईश्वरी सवर,तालुका सचिव सुजाता पारधी यांनी कंपनीला दिला आहे.

