सुनील किणी,नालासोपारा
कळंब समुद्रकिनारी विद्यार्थ्यांनी साकारली वाळूशिल्पे,
नालासोपाऱ्याच्या कळंब समुद्रकिनारी कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर वाळूशिल्प साकारून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.वसई विकसिनी दृक्-कला महाविद्यालय आणि वसई विरार शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने १९ व्या राज्यस्तरीय वाळूशिल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी वसईतील आणि मुंबई परिसरातील विविध कला महाविद्यायातील २४० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.
ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली.वरिष्ठ गटात एकूण ८ गटातून ४० स्पर्धक तर कनिष्ठ गटात एकूण ४० गटातून २०० विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते.वरिष्ठ गटात वसई विकासिनी दृक्-कला महाविद्यालयाने प्रथम आणि व्दितीय क्रमांक पटकावला तर वडाळ्याच्या जे.के.अकॅडमी ऑफ आर्ट अँड डिझाईन महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळवला.कनिष्ठ गटात मुंबई कला महाविद्यालय फाउंडेशनला प्रथम क्रमांक, वसई विकासिनी दृक्-कला महाविद्यालयाला द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक मुंबईच्या रचना संसद कॉलेज ऑफ अप्लाइड आर्ट अँड क्राफ्ट महाविद्यालयाने पटकावला.पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध विषय घेऊन यावेळी विद्यार्थ्यांनी अतिशय कलात्मकरित्या वाळूशिल्पे साकारली होती.मानवाकडून निसर्गाला पोहोचणारी हानी आणि त्याचे होणारे दुष्परिणाम,यावर उत्कृष्ट वाळूशिल्प विद्यार्थी तयार करत होते.प्रत्येक शिल्पामागे विद्यार्थ्यांचा एक विचार होता आणि त्यादृष्टीने गटागटाने विद्यार्थी वाळूशिल्प साकारण्यात दंग झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले.यात समुद्रातील दुर्मिळ जीवांचे संवर्धन,मानवी चुकांमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान,प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम,वृक्षतोड करून त्याजागी होणारे शहरीकरण,पाणी वाचावा, वसुंधरा वाचवा,असे संदेश विद्यार्थ्यांनी वाळूशिल्पातून दिले.शिल्पकार शेखर वेचलेकर व संजय वैती यांनी सदर स्पर्धेचे परीक्षण केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त जयंत बजबले यांच्या सह शिल्पकार सचिन चौधरी, वसई विकासिनी संस्थेचे अध्यक्ष नारायण मानकर, कार्याध्यक्ष शिरीष पाठारे, सरचिटणीस विजय वर्तक, राजेश पाटील,जयंत देसले, प्रफुल वनमाळी,माजी नगरसेविका किरण चेन्दवणकर,कल्पक पाटील, दिगंबर गवळी,मृणालिनी वर्तक,प्रा.दत्तात्रय ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.

