दीपक मोहिते,
माणुसकीला काळिमा,
मुला पाठोपाठ बापाने देखील गळफास घेतला,
नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यात दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थाने कपडे,वह्या व पुस्तके न मिळाल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली.हा धक्का सहन झाल्यामुळे त्याच्या वडिलांनीही त्याच दोरीला गळफास लावून आत्महत्या केली.
बिलोली तालुक्यात मिनकी या गावात ही दुर्देवी घटना घडली असून संपूर्ण जिल्हा या घटनेने हळहळत आहे.हा मुलगा उदगीर येथे दहावीत शिकत होता,शाळांना सुट्ट्या असल्यामुळे तो आपल्या घरी आला होता.परत जाण्यापूर्वी त्याने कपडे,पुस्तके व वह्या घेण्यासाठी आपल्या वडिलांकडे हट्ट धरला होता.पण वडिलांकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे त्यांनी त्याला दोन दिवस थांबायला सांगितले,पण मी आजच उदगीरला जाणार आहे,त्यामुळे मला आजच द्या,असा हट्ट धरला.पण वडील त्याची मागणी पूर्ण करू शकले नाही.काल त्या मुलाने शेतात जाऊन झाडाला गळफास लावून घेतला.मुलाच्या शोधात वडील शेतात गेले असता,त्यांनी आपल्या मुलाचा झाडाला लटकलेला मुलाचा मृतदेह पाहून अक्षरशः हंबरडा फोडला व त्यांनी मुलाचा मृतदेह झाडावरून खाली उतरवला व स्वतःला त्याच दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले.या शेतकऱ्याची केवळ दोन एकर शेती असून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसाबसा चालवायचा.
या दुर्देवी घटनेने समाजासमोर अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत.शिक्षण अधिकार कायदा,मोफत शिक्षण,या दोन्ही कायद्याची अंमलबजावणी आपल्या राज्यात कशा पद्धतीने होते,याचे हे विदारक चित्र आहे.भारतीय संविधानाने अन्न,वस्त्र व निवारा,या तीन मूलभूत गरजा असून त्या सरकारने उपलब्ध केल्या पाहिजेत,असे म्हंटले आहे.मग आपल्या राज्यात वर्षाकाठी लाखभर शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात ? मतासाठी लाडक्या बहिणींना खिरापत वाटणाऱ्या सरकारने आपला अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडावे,यासारखी दुसरी दुर्देवी बाब नसावी.पण आपल्या मायबाप मुर्दाड सरकारला त्याच्याशी काहीही देणे – घेणे नाही.राज्यात सध्या जे काही चाललंय ते माणुसकीला धरून नाही.राज्यकर्त्यांची मने मेली आहेत,त्यांच्या लेखी केवळ सत्ता महत्वाची आहे.शेतकरी व त्यांचे कुटुंबीय किड्या
मुंग्यासारखी मरत असले तरी त्यांना केवळ सत्तेचा हव्यास आहे.

