वसंत भोईर,वाडा,
धर्मवीर विचार मंचातर्फे तहसीलदार कार्यालयाला घेराव,
तालुक्यातील डोंगस्ते ग्रामपंचायतच्या हद्दीत असलेल्या दगडखदान मालकांकडून सतत होत असलेल्या बोअर ब्लास्टिंग मुळे या गावातील ग्रामस्थांच्या घरांना तडा जाऊन त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.या संदर्भात महसूल प्रशासनाकडे वारंवार अर्ज विनंत्या करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने अखेर आज धर्मवीर विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद पष्टे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयाला घेराव घालून जाब विचारला.
डोंगस्ते गावालगत असलेल्या मे.सी. स्क्वेअर कं.लि.( कॅप्टन इन्फ्रा लि.), मे. गुरुकृपा इंटरप्राईजेस या दगडखदान व्यवसायिकांकडून दिवस-रात्र बोअर ब्लास्टिंग केली जात असल्याने या गावातील अनेक गोर-गरीब शेतकरी,शेतमजुरांच्या घरांच्या भिंतीना तडे जाऊन घरांचे मोठे नुकसान झाले आहे.शिवाय येथील नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे.क्षतिग्रस्त घरांना गेलेल्या तडे व नुकसानीची चौकशी करून नुकसानभरपाई देण्यात यावी,तसेच पिढ्यान पिढ्या जंगलात शेती करणा-या आदिवासी बांधवांची अडवली जाणारी वाट मोकळी करून द्यावी,अशा विविध मागण्यांसाठी वारंवार प्रशासनाकडे अर्ज,विनंत्या,करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने अखेर धर्मवीर विचार मंचाच्या माध्यमातून या गावातील ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयाला घेराव घालून याचा जाब विचारला.
या मोर्चात धर्मवीर विचार मंचचे अध्यक्ष मिलिंद पष्टे,सचिव अक्षय पष्टे, उपाध्यक्ष धिरज भोईर,दिनेश राऊत,समीर शेलार,सहसचिव राहूल पाचलकर,खजिनदार सागर पाटील,संदीप पाटील, संदेश पाटील,देवदत्त शेलार, रितेश राऊत,विकास गिंभल आदी पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

