जव्हार प्रतिनिधी,
वाचनाचे अनेक फायदे असुन युवकांनो वाचक व्हा – नितीन आहेर,
वाचनाचे अनेक फायदे असून युवकांनी वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे,असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षक नितीन आहेर यांनी केले.ते गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आयोजित ” महाराष्ट्राचा वाचन संकल्प, ” या उपक्रमांतर्गत व्याख्यानमालेत बोलत होते.
नितीन आहेर हे जिल्हा परिषद शाळा नवीवाडी येथील प्राथमिक शिक्षक असून पालघर जिल्ह्यात उत्तम वक्ते व प्रसिद्ध सूत्रसंचालक म्हणून ओळखले जातात.आपल्या भाषणात त्यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की,वाचनामुळे ज्ञान, शब्दसंग्रह,सकारात्मकता, विचारशक्ती,सर्जनशीलता, कल्पनाशक्ती,एकाग्रता आणि संयम वाढतो.तसेच,वाचनाने आत्मविश्वास आणि हजरजबाबीपणाही वृद्धिंगत होतो.
आहेर यांनी आपल्या भाषणात महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,अब्राहम लिंकन, स्वामी विवेकानंद आणि आईन्स्टाईन यांच्या वाचनाच्या सवयींमुळे त्यांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांचे उदाहरण दिले.भगतसिंग यांच्या वाचनप्रेमाची आठवण करून देताना त्यांनी सांगितले की,भगतसिंग यांनी फाशीच्या आदल्या रात्रीही पुस्तक वाचले होते.तसेच,त्यांनी संत गाडगे महाराजांचे उदाहरण देत सांगितले की, ” मुलांना नवीन कपडे खरेदी करण्यापेक्षा पुस्तकं द्या,कपडे तात्पुरता आनंद देतील,पण पुस्तकं जीवन बदलतील.” युवकांनी व्यसनाधीनतेकडे वळण्याऐवजी पुस्तकांशी मैत्री करून आपले जीवन समृद्ध करावे,असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
सोशल मीडियाचा अतिरेकी वापर टाळून वर्तमानपत्रे, चरित्रे,आत्मचरित्रे, कथा-कादंबऱ्या,प्रवासवर्णने आणि कवितासंग्रह यांचे वाचन करण्याचे आवाहन त्यांनी युवकांना केले.या कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक शैलेश बगदाणे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.आर.मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. यावेळी प्राध्यापक शैलेश बगदाणे,प्रा.सुदर्शन काळे, प्रा. जोत्स्ना राव आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

