वसंत भोईर,वाडा,
आदिवासी विकास महामंडळाच्या भातावर उंदीर घुशींचा डल्ला,साडेचार हजार क्विंटल भात वाया
तालुक्यात आदिवासी विकास महामंडळातर्फे आधारभूत भात खरेदी केंद्राद्वारे शेतकऱ्यांचे भात खरेदी करण्यात येते.दरवर्षी काही ना काही कारणाने ही खरेदी वादात सापडत असते. या विभागाचे अधिकारी मात्र उपाययोजना करण्याऐवजी जव्हार,मोखाडा येथील कार्यालयात बसून उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम असतात.त्यांच्या या गलथान कारभारामुळे बळीराजा मात्र पार मेटाकुटीला आला आहे.अनेक हेलपाटे मारून ही ऑनलाइन नंबर येत नसल्याने व जानेवारी अर्धा संपत आला तरी शेतकऱ्यांच्या भाताची खरेदी विक्री होऊ शकली नाही.ते भात देण्यासाठी तिष्ठत उभे असल्याचे पाहायला मिळत आहेत.तर दुसरीकडे मात्र गोदामे जुन्या भातानेच भरलेली आहेत.त्यामधील धान्यावर उंदीर – घुशी डल्ला मारत आहेत.त्यामुळे गोरा गोदामाचे सुमारे साडेचार हजार क्विंटल भात वाया गेले आहॆ.या गैरप्रकाराला जबाबदार असणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
गेल्या वर्षी आदिवासी विकास विभागातर्फे वाड्यातील शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेले भात गोदामामध्ये तसेच पडून आहे. सध्या त्या भाताची उंदीर घूशींनी प्रचंड नासाडी केली आहे.गो-हा केंद्राप्रमाणेच इतर ही गोदामामध्येही मोठ्या प्रमाणात भाताचा साठा शिल्लक आहे.गेल्या वर्षाचा भात जोपर्यंत उचलला जात नाही,तोपर्यंत येथे नवीन भात साठवण्यात येणार नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे येथील भात खरेदी -विक्री वादात अडकते की काय ?अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
तालुक्यातील भात खरेदी -विक्री केंद्राच्या.गोदामामध्ये भात भरण्यासाठी आलेली हजारो पोती शिल्लक असूनही शेतकऱ्यांना जुनी फाटलेली पोती दिली जात आहेत. उरलेल्या नवीन पोत्यांची इतरत्र विक्री केली जात असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.सध्या नवीन पोती उपलब्ध झाली नसल्याचे कारण केंद्र चालक सांगत आहेत.अन्यथा तुम्ही विकत घ्या किंवा काही करा,पण केंद्रावर मात्र पोत्यामध्ये भरलेले भातच स्विकारले जाईल,अशी उर्मट उत्तरे केंद्रावर शेतकऱ्यांना दिली जात आहेत.येथील शेतकऱ्यांची होणारी ही पिळवणूक थांबवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
या संदर्भात आदिवासी विकासमंत्री यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच जुने भात उचलून लवकरात लवकर नवीन भात ठेवण्यासाठी गोदामे रिकामी करून शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर केली जाईल.
-हरिचंद्र भोये, आमदार विक्रमगड मतदारसंघ
आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराकडे प्रशासनाने लक्ष देऊन शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी.
-वसंत पाटील, शेतकरी,
.

