वसंत भोईर,वाडा,
वाडा – वडवली हद्दीतील टायर कंपन्या उठल्या शेतकऱ्यांच्या मुळावर,
तालुक्यातील वडवली ग्रामपंचायत हद्दीतील मुसारणे पाडा व चिंचघरपाडा येथील टायर कंपन्या शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्या आहेत. त्यांच्या मातीभरावाने येथील शेतकऱ्यांची भातशेती पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहॆ.त्यामुळे परिसरातील शेतजमिनी नापीक होणार आहेत.येथील शेतकरी आता देशोधडीला लागणार आहेत. त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. शिवाय या कंपन्यानी येथील नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलून पाण्याचा मार्ग बदलला आहे व नालाही अरुंद केल्याने नाल्याच्या पाण्याचा निचरा होणार नाही.त्यामुळे शेतजमिनीची नासाडी होणार होईल,असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहॆ.या नाल्यात रसायन मिश्रित दूषित पाणी सोडले जात असल्यामुळे नागरिकांसह गुराढोरांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे.या कंपन्या इतरत्र हलवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
या कंपन्यातून निघणाऱ्या प्रचंड धुरामुळे येथील ग्रामस्थांना श्वसनाचे आजार जडू लागले आहेत. रात्रंदिवस उग्र वासाचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे वारंवार अर्ज विनंती करूनही अधिकाऱ्यांकडून जाणून-बुजून कानाडोळा केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.या कंपन्यांमधून निघणारे टाकाऊ रसायन हे थेट नाल्यात सोडले जात असल्याने पाणी दूषित झाले असून पाण्याला उग्र दुर्गंधी येत आहे.त्यामुळे या गावातील नागरिक व प्राण्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने याची तत्काळ दखल घेऊन या कंपन्यांविरोधात कारवाईचा बडगा उभारावा अन्यथा नागरिक तीव्र आंदोलन छेढतील असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
या प्रदूषणकारी कंपन्यांविरोधात वारंवार तक्रारी करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी कुठलीही कारवाई करत नसल्याने नागरिकांसह गुरांचे जनजीवन धोक्यात आले आहे.प्रशासनाने या कंपन्यांवर कारवाईचा बडगा उभारला नाही तर,आम्ही तीव्र आंदोलन छेडू.
-कल्पेश पाटील, ग्रामस्थ

