संजय परब,पालघर
तलासरी येथे भव्य शेतकरी मेळावा आणि प्रशिक्षण शिबिर संपन्न,
आज तलासरी पंचायत समिती सभागृह येथे जिल्हा परिषद पालघर व पंचायत समिती तलासरी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शेतकरी मेळावा व पशुपालक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आला होता.जिल्हा परिषद पालघर कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती संदिप पावडे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. पंचायत समिती सदस्य राजेश खरपडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा परिषद सदस्य तथा कृषी समिती सदस्य विजय उराडे,जिल्हा परिषद सदस्य अनिल झिरवा, पंचायत समिती सदस्य भरत कडू,जयवंती गोरखना यांच्या उपस्थितीत हे शिबिर पार पडले.
सभापती संदीप पावडे यांनी कृषिप्रधान देशाच्या शेतकरी राजाने कोरोना सारख्या संकटामध्ये देशातील जनतेला या कठीण प्रसंगी सर्वाधिक मदत केली.हे शेतकरी व पशुपालक प्रशिक्षणाचे मेळावे सिमित न राहता ते व्यापक,ज्ञानवर्धक असले पाहिजे.सर्व योजनांची माहिती ग्रामसभेतर्फे लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे,असे सांगून मेळाव्यास उपस्थित तालुका कृषी अधिकारी व कृषि अधिकारी यांना त्यांनी ग्रामसभांना आपले अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहुन योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची सूचना केली.
विक्रमगड तालुक्यातील खोमारपाडा येथे,सासणे येथे शेतकऱ्यांनी भातशेती व्यतिरिक्त गवार,कारले आदि पीके घेऊन शेतकरी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहेत, यांचे दाखले देऊन प्रशिक्षित होऊन शेतकऱ्यांनी व पशुपालकांनी अत्याधुनिक शेतीकडे वळले पाहिजे,असे सूचवले.
पंचायत समिती सदस्य राजेश खरपडे यांनी शेतकरीवर्गाला व्यवसायाकडे घेऊन जाण्याच्या उद्देशाने शासनाने हे शिबिराचे आयोजन केले आहे. कृषि व पशुसंवर्धन विभागांच्या मार्गदर्शनाने शेतकरी व पशुपालक यांनी ज्ञान आत्मसात करावा व जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन यावेळी केले.
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.प्रकाश हसनाळकर यांनी जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या योजना संबंधी माहितीपर मार्गदर्शन केले. विद्यमान कृषी व पशु संवर्धन समिती सभापती संदिप पावडे यांनी आपल्या कार्यकाळात योजनांचे परंपरागत सातत्य न ठेवता नाविन्यपुर्ण योजना प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी आम्हा कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या खातेप्रमुखांना प्रेरित केले. यातील काही योजना केवळ महाराष्ट्रात आपली जिल्हा परिषद पालघर ही अंमलात आणत आहे,असे प्रतिपादन केले.जिल्हा कृषी अधिकारी विश्वजीत माने यांनी विविध योजना संबंधी विस्तृतपणे मार्गदर्शन करीत तीन प्रमुख घटकांच्या माध्यमाने योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत कसे पोहोचवतो हे सांगितले. शेतकऱ्यांनी उत्पन्नवाढ करून सामाजिक प्रगती साधावी, याकरिता शेतकरी व पशुपालक याकरिता आम्ही सेवारत आहोत,असे पुढे त्यांनी स्पष्ट केले.डॉ.भुवनेश्वर बोरकर,जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पालघर यांनी प्रशिक्षणाच्या माध्यमातुन शिकणे गरजेचे आहे.अभ्यासू वृत्तीने आपल्याला उत्पन्न वाढीचा उद्देश साध्य करता येईल.मानवीजातीची सुरुवात कृषी व पशुसंवर्धनाच्या माध्यमाने झाली.उद्योजकता या उद्देशाने आपले ध्येय असले पाहिजे.उत्पादन वाढीबरोबर शेतमालाचा दर्जा सुधारला पाहिजे,त्यामुळे शेतकऱ्याचा आर्थिक स्तर उंचावता येईल,असे सांगितले.
येथे उपस्थित स्थानिक आदिवासी तरुण पशुपालक अजित सुतार,मौजे करजगाव यांनी त्यांचा कुक्कुटपालन करून मोठ्या व्यवसाय निर्माण केल्याचा अनुभव सांगून आज त्यांच्याकडे १२ ते १३ जातीच्या कोंबड्या आहेत.आज प्रगतिशील कुक्कुटपालन व्यवसायातून वार्षिक १५ ते १७ लाखाची उलाढाल करत असल्याचे अनुभवपर मार्गदर्शन उपस्थित शेतकरी व पशुपालक यांना केले.त्यानंतर रवी सोनवाल मौजे तलासरी,वराहपालन स्थानिक तरुण उद्योजक यांनी कोणत्याही योजनेचा पाठबळ न घेता वराह पालनातून त्यांनी वार्षिक १८ ते २० लाखाची उलाढाल करत आहेत,असे सांगितले.उद्योगाची सुरुवात त्यांनी अगदी भाड्याने जागा घेऊन केली.मिरची लागवड याबाबत आशिष ठाकरे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. या मेळाव्यात शेतकरी व पशुपालक यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून प्रशिक्षणाचा लाभ घेतला. स्थानिक तरुण आदिवासी कुक्कुटपालक उद्योजक अजित सुतार यांनी मेळाव्याच्या ठिकाणी पक्षी प्रदर्शन आयोजित केले होते. त्यास मान्यवरांनी भेट दिली व कुक्कुट उद्योजक अजित सुतार यांचा सपत्नीक सत्कार सभापती संदिप पावडे यांनी केला व त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले.या मेळाव्यास, डॉक्टर सिद्धार्थ साबळे,सहा. आयुक्त डहाणू,तालुका कृषी अधिकारी ईभाड,पंचायत समिती तलासरीचे कृषी अधिकारी तेजल गावित व पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती तलासरी चे डॉ.भूषण मयेकर, पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.मंदार पटेल व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

