जव्हार प्रतिनिधी,
” राष्ट्र निर्मितीमध्ये युवकांची भूमिका महत्त्वाची, ” याविषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
युवक,ही देशाची खरी ताकद असून,त्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात यश संपादन करून देशाचा गौरव आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढवावा,असे प्रतिपादन जिल्हा परिषद शाळा नवीवाडीचे प्राथमिक शिक्षक नितीन आहेर यांनी केले.ते मुरलीधर नानाजी मोहिते गुरुजी कला,वाणिज्य व बीएमसी महाविद्यालयाने आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात बोलत होते.
” राष्ट्र निर्मितीमध्ये युवकांची भूमिका,” या विषयावर मार्गदर्शन करताना नितीन आहेर यांनी यादवकालीन, शिवकालीन,स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील युवकांची भूमिका विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडली.त्यांनी दिलेली उदाहरणे,इतकी प्रभावी होती की प्रत्येक प्रसंग जिवंतपणे अनुभवल्याचा प्रत्यय विद्यार्थ्यांना आला.
नितीन आहेर यांनी सांगितले की,युवकांनी व्यसनाधीनतेपासून दूर राहून, योग्य ध्येय निश्चित करून चिकाटी,संयम,इच्छाशक्ती, आणि संघर्ष करण्याची तयारी बाळगली पाहिजे.त्यांनी आवाहन केले की, ” शून्यातून विश्व निर्माण करा, परिस्थितीच्या डोक्यावर पाय ठेवून पुढे जा,”
कार्यक्रमात मोखाडा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी प्रेमनाथ ढोले,पोलीस उपनिरीक्षक विकास दरगुडे यांनी कायदा व सुव्यवस्था याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की,कायदा व सुव्यवस्था राखणे,ही पोलिसांची प्राथमिक जबाबदारी असून ती व्यवस्थित पार पाडली जात आहे.कायदा आणि सुव्यवस्था परस्परांवर अवलंबून असून शांततेसाठी दोन्हींचा समन्वय महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.दीपक कडलक,प्रा. पगारे,प्राध्यापक नवनाथ शिंगवे व इतर प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

