नवीन पाटील,सफाळे,
पाणीटंचाईवर तातडीने उपाययोंजना करण्याचे आश्वासन,
पालघर शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचा पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनत चालला असून,यावर तातडीने उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन पालघर विधानसभा मतदारसंघाचे आ. राजेंद्र गावित यांनी एका बैठकीत दिले.
सध्या पालघर भागातील सातपाटी,मोरेकुरण,दापोली, उमरोळी,पंचाळी,पडघे,कमारे व अन्य काही गावांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत असून,नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.या गावांना पालघर नगर परिषदेसह २६ गावाना पाणीपुरवठा करण्यात येत असतो.पालघर हे जिल्ह्याच्या मुख्यालयाचे शहर असल्यामुळे पालघर नगरपरिषद क्षेत्रात मोठ्याप्रमाणात नागरिकरण सुरु झाले आहॆ. दिवसागणिक नागरी संकुले उभी राहत आहेत.त्यामुळे पाण्याची मागणी वाढलेली आहे.तसेच ग्रामीण भागातील २६ गावांना पुरेसे पाणी मिळत नाही.त्यासाठी वाढीव पाण्याची मागणी शासनाकडे करणे आवश्यक आहे,यासाठी स्थानिक आमदाराने प्रयत्न करावेत,अशी मागणी या गावातील सरपंचांनी केल्यावर आ. राजेंद्र गावीत यांनी वाढीव पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील,असे आश्वासन दिले.यासंदर्भात स्थानिक प्रशासन आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक नुकतीच झाली होती.
पाणीप्रश्न सोडवण्यासाठी विविध योजना राबवण्याचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी या बैठकीत सांगितले. प्रत्येक नागरिकाला स्वच्छ व पुरेसे पाणी देणे हे माझे प्रथम कर्तव्य आहॆ, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. पाणीपुरवठा सुधारण्यासाठी नवीन पाईपलाईन,जलकुंभ उभारणी,तसेच जलस्रोत व्यवस्थापनाच्या उपाययोजना करण्यात येतील,असे त्यांनी यावेळी सांगितले.

