दीपक मोहिते,
नेमकं दडलंय काय ?
धनंजय मुंडेच्या आडून अजित पवार यांचा गेम ?
गेल्या पंधरा दिवसापासून संतोष देशमुख हत्येचे प्रकरण राज्यभरात गाजत आहे.भाजपचे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आ.सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरले आहे.हत्येची घटना घडल्यानंतर आ.धस यांनी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची एक ना अनेक प्रकरणे बाहेर काढली.त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मुंडे यांचा कट्टर समर्थक असलेल्या वाल्मिक कराड याला पोलिसांच्या स्वाधीन व्हावे लागले.तर एक वगळता इतर सर्व आरोपी एकामागोमाग गजाआड झाले.सुरेश धस नंतर अंजली दमानिया व आता आ.चित्रा वाघ,यांनीही आता या प्रकरणात उडी घेतली आहे.संतोष देशमुख हे भाजपचे असून त्यांची अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आल्यामुळे भाजपच्या गोटात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.धनंजय मुंडे व वाल्मिक कराड,हे दोघेही अजित पवार गटाचे आहेत.अजित पवार गट महायुतीचा भाग असताना धस व वाघ यांनी याप्रकरणी धनंजय मुंडे यांची तर आ.धस यांनी वाल्मिक गुंड व त्यांच्या गुंडाची पळता भुई थोडी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.धनंजय मुंडे यांच्या आडून भाजप अजित पवार यांना लक्ष्य करतोय,असे प्रथमदर्शनी असे स्पष्ट होत आहे.आ.चित्रा वाघ यांनी अंजली दमानिया यांना धमक्या देणाऱ्या गुंडांच्या विरोधात कारवाई करावी,असे पत्र पोलिसांना पाठवले.तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंजली दमानिया यांना भेट दिल्यामुळे अजित पवार गट धास्तावला आहे.वरील सर्व घडामोडीमुळे राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
आ.सुरेश धस व आ.चित्रा वाघ यांचा बोलवता धनी हा
भाजपमधील वरिष्ठ एक नेता असून त्यांच्या सांगण्यावरून अजित पवार यांचा गेम करण्यात येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहॆ.अजित पवार यांचा गट महायुतीमध्ये सामील झाल्यापासून भाजपचा एक गट अस्वस्थ झाला आहॆ. आपल्या नेत्यांनी ही ब्याद आपल्या गळ्यात बांधायला नको होती.तर शिंदे गट देखील अजित पवार गटाला सोबत घेतल्यापासून नाराज आहॆ. लोकसभा निवडणुकीत महायुतीला जो फटका बसला तो पवार गटाला सोबत घेतल्यामुळे,अशी थेट टीका भाजपच्या मुखपत्राने केली होती.संतोष देशमुख हत्येनंतर भाजपमधील अनेक आमदार हे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून हटवण्यात यावे, अशा मताचे आहेत.पण भाजपचे वरिष्ठ नेते ” वेट अँड वॉच,” च्या भूमिकेत असून अजित पवार हे याविषयी कसा निर्णय घेतात,याकडे लक्ष लावून आहेत.मात्र आ.धस, आ.वाघ व सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या तिघांनी ज्याप्रकारे आघाडी उघडली,त्यावरून त्यांच्यामागे कोण आहॆ,हे सांगायला नको. याप्रकरणी अजित पवार यांनी जे मौन बाळगले आहे, त्यावरून काय चाललंय,यांची त्यानाही खबरबात असावी, अशी त्यांची बॉडीलँग्वेज सांगते.

