दीपक मोहिते,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये भाजप,शिंदे गटाची गळचेपी करणार,
विधानसभा निवडणुकीनंतर भाजप,आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.इतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात सामावून घेण्यासाठी विविध आमिषे दाखवण्यात येत आहेत.मुंबई,ठाणे,कल्याण-डोंबिवली,
कुळगाव-बदलापूर,भिवंडी-निजामपुर,उल्हासनगर व वसई-विरार शहर महानगरपालिका यावर त्यांचे विशेष लक्ष आहे.नवी मुंबई महानगरपालिका गणेश नाईक यांच्या ताब्यात असल्यामुळे येथे त्यांना कोणतीही अडचण भासणार नाही.येथे सर्व अधिकार नाईक यांच्या कडे सोपवण्यात येणार आहेत.तसेच ठाणे व पालघर जिल्हा परिषदा सध्या शिंदे गटाच्या ताब्यात आहेत.त्याही आता भाजप हिसकावून घेण्याच्या तयारीत आहे.पालघर लोकसभा व वसई,नालासोपारा,पालघर,बोईसर व विक्रमगड या पाच विधानसभा त्यांच्या ताब्यात असल्यामुळे भाजप,शिंदे गटाची या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगलीच मुस्कटदाबी करेल.पालघर व बोईसरचे आ.राजेंद्र गावित व आ.विलास तरे,हे शिंदे गटाच्या तिकिटावर निवडून आले असले तरी ते मूळचे भाजपचे आहेत.त्यामुळे पालघरच्या राजकारणात आता शिंदे गटाची प्रचंड कोंडी होणार आहे.वसई व नालासोपारा या दोन विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाची ताकद नगण्य असल्यामुळे त्यांची मनपा निवडणूक प्रक्रियेत डाळ शिजणार नाही.त्यामुळे भाजप काही किरकोळ जागा त्यांच्यासाठी सोडेल.अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस,या दोन्ही मतदारसंघात औषधालाही सापडत नाही,त्यामुळे भाजप,त्यांना दारात देखील उभी करणार नाही.राष्ट्रवादी काँग्रेस,एकसंघ असतानाही त्यांना येथे एकही निवडणूक लढवता आली नाही.त्यामुळे अजित पवार यांचा गट निवडणूकीच्या रिंगणात उतरेल,असे वाटत नाही.येथे भाजपची लढत बहुजन विकास आघाडीशीच होईल,त्यादृष्टीने भावी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व भावी पालकमंत्री गणेश नाईक,हे दोघे नुकतेच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहेत.अनेक तरुणांना पक्षात प्रवेश देणे, त्यांनी सुरू केले आहे.विरोधी पक्ष फोडाफोडीची वात अद्याप पेटवली नसली तरी येणाऱ्या काळात ते पेटवण्याच्या तयारीत आहेत.त्यांनी विरोधी पक्षाच्या नगरसेवक,पदाधिकारी व नेत्यांना वश करण्याचा प्रयत्न केला,तरी त्यांना कितपत यश मिळेल,हे सांगणे सध्या तरी कठीण आहे.विरोधी पक्षाच्या नाराजाना त्यांनी आपलेसे केले तरी त्यांना उमेदवारी देणे शक्य होणार नाही.भाजपचे अनेक कार्यकर्ते उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत.त्यांना नाराज करून,बाहेरून आलेल्या उपऱ्याना उमेदवारी देणे, म्हणजे पक्षाच्या पराभवाला आमंत्रण देण्यासारखे आहे.भाजप ज्या पद्धतीने सध्या खोगीर भरती करत आहे,ती लक्षात घेता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर पक्षात बजबजपुरी निर्माण होण्याची शक्यता आहे.गेल्या दोन दिवसात सुमारे १०० ते १५० तरुण-तरुणी भाजपमध्ये सामील झाले.त्यांच्या पाठीमागे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही,पण येणाऱ्या काही दिवसात चव्हाण व नाईक ही जोडगोळी ” ऑपरेशन लोटस,” राबवतील, अशी शक्यता आहे.

