नवीन पाटील,सफाळे,
कुणबी समाज आयोजित क्रिकेट स्पर्धेत भादवे संघाचा दणदणीत विजय…
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञातीहितवर्धक ( कुणबी ) समाजाच्या खटाळी गटातील सफाळे संघाच्या सहकार्याने काल कपासे येथील क्रीडा मैदानात मर्यादित षटकाच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेच्या अंतिम व अटीतटीच्या सामन्यात भादवे संघाने कपासे संघावर २७ धावांनी मात करीत विजेतेपद पटकावले.तर कपासे संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.
सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञातीहितवर्धक ( कुणबी ) समाजाच्या खटाळी गटातील सफाळे संघाच्या माध्यमातून समाजाच्या विविध गटाच्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.क्रिकेट प्रमुख ऋषी पाटील आणि सफाळे संघानी स्पर्धेसाठी विशेष आयोजन केले होते.यावेळी सफाळे, खटाळी,कपासे,भादवे, उसरणी,माकणे आणि दातीवरे हे संघ सहभागी झाले होते.समाजाच्या विविध गटाच्या संघात दिवसभरात पाच षटकांचे सामने खेळवण्यात आले.यात भादवे आणि कपासे हे दोन संघ अंतिम फेरीत दाखल झाले.या दोन्ही संघांच्या खेळाडूंनी वेळेची मर्यादा पाळत प्रत्येकी चार षटकांचे सामने खेळण्याचे निश्चित केले.भादवे संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी स्विकारली व चार षटकांमध्ये ५५ धावांचे आव्हान कपासे संघापुढे ठेवले.मात्र भादवे संघाच्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणापुढे कपासे संघाचे फलंदाज गारद होत गेले व ते केवळ २८ धावांपर्यंत मजल मारू शकले. त्यामुळे भादवे संघाचा दणदणीत विजय झाला.विजेत्या आणि उपविजेत्या संघाला ट्रॉफी आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.या उपक्रमास खटाळी गटाचे विश्वस्त विजय पाटील आणि बिपीन पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनुप पाटील,युवा सेना पालघर प्रमुख राकेश पाटील,खटाळी गटाचे अध्यक्ष रुपेश पाटील, नरेश पाटील,विपिन ठाकूर, अरुण पाटील,हेमकांत वैद्य, पत्रकार नवीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
बॉक्स कोट…१
या सामन्यांमध्ये ” मालिकावीर, ” आणि उत्तम फलंदाज म्हणून अपराज वैद्य यांनी किताब मिळवला.तर “ सामनावीर ” आणि “ उत्तम क्षेत्ररक्षक ,” म्हणून करण नाईक तसेच ” उत्तम गोलंदाज, ” म्हणून अक्षय ठाकूर यांची निवड करण्यात आली.सामन्याचे धावते समालोचन जय वैद्य यांनी आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत केले.तर ट्रॉफी आणि जेवणाची व्यवस्था समीर महाले यांनी केली.
बॉक्स कोट…२
यावेळी समाजाचे अधिवेशन खटाळी गटामध्ये होणार असल्याने त्यासंबंधित रूपरेषा,गावनिवड, पावतीपुस्तक छापणे, स्मरणिका,मंडप,भोजन व्यवस्था आणि नियोजन समिती स्थापन करणे,अशा विविध मुद्द्यांवर वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्यात आली.यात यंदाचे अधिवेशन कपासे येथे आयोजित करण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला असून लवकरच गावपातळीवर सर्वानुमते निर्णय घेऊन अधिवेशनाची पुढील वाटचाल निश्चित करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

