वसंत भोईर,वाडा,
बळीराजाची लूट सुरूच: भराईला पोते नाहीत,साठवणुकीला जागा नाही,
तालुक्यात सुरू असलेल्या भातखरेदी केंद्रांना महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास मंडळाच्या उदासीन कारभाराचे ग्रहण लागल्याने भात खरेदीचा पुरता भोजवारा उडाला आहॆ.त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या मनस्ताप सहन करावा लागत आहे.
महाराष्ट्राच्या सहकारी आदिवासी विकास महामंडळातर्फे वाडा तालुक्यात परळी,मानिवली,गो-हे, गुहिर, पोशेरी,कोनसई,सारशी,खैरे -आंबिवली येथे भातखरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.परंतु या केंद्रांवर भात भरण्यासाठी लागणारे पोतीच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना अनेक दिवस हेलपाटे मारून ही भात विक्री करता येत नाही.तसेच या केंद्रावरील कर्मचारी शेतकऱ्यांना उडवा उडवीची उत्तरे देऊन अपमानित करत असल्याच्या अनेक शेतकरी तक्रारी करत आहेत.केंद्रावर भात घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना भाताची प्रतवारी ठरविताना नुकसान सोसावे लागत असल्याचे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वाडा तालुका हा भौगोलिक दृष्ट्या मोठा असून या तालुक्यात भात पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते.तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते.त्यामुळे तालुक्यात जास्तीत जास्त भात खरेदी केंद्र उघडणे अपेक्षित असताना मोजकीच केंद्र उघडल्याने शेतकऱ्यांची गर्दी या केंद्रांवर होत आहे. त्यामुळे केंद्रांच्या भात साठवणुकीच्या गोडाऊनची क्षमता मर्यादित असल्याने अनेक शेतकरी भात विक्री पासून वंचित राहत आहेत.
तालुक्यातील महसुली गावांची संख्या १५० हून अधिक असताना केवळ आठ भात खरेदी केंद्र सुरू केल्याने या केंद्रांवर भात घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांना वीस ते पंचवीस कि.मी.अंतराचा प्रवास करून जावे लागत आहे.त्यासाठी होणारा प्रवासखर्च शेतकऱ्यांना परवडत नाही.अशा या शासनाच्या उदासीन धोरणामुळे वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांना हमीभावापासून वंचित राहावे लागत आहे. तालुक्यातील चिंचघरपाडा येथील शेतकरी वसंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तालुक्यातील भात खरेदी केंद्रांची संख्या कमी असून भातखरेदी करण्याचे प्रमाण अल्प आहे.शिवाय शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारूनही पोती मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली.

