नवीन पाटील,सफाळे,
मुलींना स्वावलंबी जीवन जगता येईल,असे शिक्षण दिले पाहिजे – स.पो.नी. विजया गोस्वामी,
पालघर जिल्हा हा आदिवासी व ग्रामीण भाग असून आजही येथे बालविवाहाचे मोठे प्रमाण दिसून येते.त्यामुळे मुलींना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल व स्वावलंबी जीवन जगता येईल असे शिक्षण दिले गेले पाहिजे,असे मत केळवा सागरी पोलीस स्टेशनच्या सहा.पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांनी व्यक्त केले.३ जाने.रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी ” बालिका दिन, ” व ” महिला मुक्तीदिन, ” साजरा करण्यात येतो.याच दिनाचे औचित्य साधून संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य संस्थेतर्फे सफाळे देवभूमी येथे समाजातील कर्तृत्ववान महिला तसेच सेवाभावी व्यक्ती व संस्था यांना पुरस्कार देण्याचा सोहळा आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी सपोनी गोस्वामी बोलत होत्या.
आपल्या भाषणात त्या पुढे म्हणाल्या की,सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर वैयक्तिक – खाजगी फोटो अथवा व्हिडीओ टाकू नयेत, त्याचा आवश्यक तेवढाच व सावधतेने वापर करावा. माझ्या कोणत्याही महिला भगिनीला सोशल मीडियाच्या माध्यमातून त्रास देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील,अशी ग्वाही देखील सपोनि गोस्वामी यांनी यावेळी दिली.तर संस्थेच्या अध्यक्ष सुमनताई मानकर यांनी प्रत्येक व्यक्तींमध्ये दैवी आणि राक्षसी,अशा दोन्ही प्रवृत्ती लपलेल्या असतात.राग, द्वेष,हेवा या राक्षसी प्रवृत्तीचा वेळच्या वेळी नाश करून एकोप्याने समाजाच्या कल्याणासाठी एक विचाराने कार्य केले पाहिजे,असे आवाहन केले.
समाजात निःस्वार्थ भावनेने, तळमळीने व सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या तसेच विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षण, भावनिक- बौद्धिक वाढ,अशा सर्वांगीण विकासामध्ये शिक्षक वर्ग,अंगणवाडी सेविका,आशा सेविका,मदतनीस,गट प्रवर्तक महिला वर्ग यांचा मोलाचा वाटा असतो.याची दखल घेत त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी संघर्ष संघटनेमार्फत ” सावित्रीच्या लेकी,” ” सेवाभावी पुरस्कार, ” आणि ” क्रांती ज्योती पुरस्कार, ” असे विविध पुरस्कार देण्यात आले.यावेळी पुरस्कृत व्यक्तींना शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सुमनताई मानकर,प्रमुख पाहुण्या केळवे पोलीस स्टेशनच्या एपीआय विजया गोस्वामी,संघटनेचे सरचिटणीस आर.बी.सिंग, सफाळे ग्रामपंचायत सरपंच तनुजा किणी,पीएसआय ज्ञानेश्वर सावंत,मुख्य सेविका सूर्यवंशी मॅडम,आदी विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जतीन कदम यांनी पार पाडले तर सारिका गायकवाड यांनी आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता केली.
बॉक्स कोट….
संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य संस्था ही २००९ पासून कार्यरत असून संस्थेच्या अध्यक्षा सुमनताई मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी १५ जून ‘शाळेचा पहिला दिवस’, ५ सप्टेंबर ‘शिक्षक दिन’ आणि ३ जानेवारी ‘महिला मुक्तीदिन’, ‘आदर्श कुटुंब’ असे दिनविशेष साजरे केले जातात. या निमित्ताने सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थाचा सत्कार करून जनजागृती पर अनेक कार्यक्रम घेतले जातात. शिवाय समाजातील अन्याय ग्रस्त महिला व मुली, गरीब, असंघटित मजूर वर्ग यांच्यासाठी या संस्थेमार्फत विशेष कार्य केले जाते. आपण ही समाजाचे देणे लागतो या भावनेतून संस्थेमार्फत कोरोना काळात गृहोपयोगी वस्तू, विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू, महिला, वृद्ध यांना औषधांचे मोफत वाटप अशा विविध माध्यमातून भरीव असे सहकार्य करण्यात आले होते. संघर्ष संघटनेच्या रायगड, रत्नागिरी, सातारा, पालघर अशा विविध ठिकाणी शाखा असून मोठ्या प्रमाणावर वाटचाल सुरू आहे.

