संदीप मेहेर, पालघर,
पालघर जिल्ह्यात ” स्वच्छ माझे आंगण,” अभियान,
जिल्ह्यात कुटूंबस्तरावर वैयक्तिक शौचालय,घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी अभियान सुरु करण्यात आले आहॆ.स्वच्छतेची सवय अंगीकृत करणे,नियमितपणे वापर करणाऱ्या कुटूंबांना प्रोत्साहन देणे,त्यांचे अनुकरण करण्याकरीता इतर ग्रामस्थांना,कुटूंबधारकांना त्यांच्याप्रमाणे वैयक्तिक स्वच्छतेच्या सुविधा आपल्या घरात किंवा परिसरात उपलब्ध करून घेण्यासाठी पालघर जिल्ह्यामध्ये १ ते २० जाने. २०२५ या कालावधीत ” स्वच्छ माझे आंगण, ” अभियान राबवण्यात येत आहे.
ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावण्यासाठी स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा -२ अंतर्गत स्वच्छतेची विविध कामे करण्यात येत आहेत.कुटूंबस्तरावर वैयक्तिक शौचालय,घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत जिल्ह्यात ज्या कुटुंबानी वैयक्तिक शौचालय वापर, सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डा,परसबाग,पाझर खड्डा,घनकचरा व्यवस्थापनाकरीता कंपोस्ट खतखड्डा अथवा घरगुती खतखड्डा तसेच कुटुंबस्तरावर कचराकुंड्या याबाबतची उपलब्धता करून घेतली आहॆ.अशा कुटुंबांना प्रोत्साहन देत इतरही कुटुंबांनी त्यांचे अनुकरण करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबवण्यात येत आहे.देखभाल दुरुस्ती करण्यासाठी कुटुंबाने पुढाकार घेणे,घरगुती स्तरावर कचऱ्याचे वर्गीकरण करणे,कुटुंबस्तरावर सुका,ओला कचराकुंड्यांमध्ये वर्गीकरण करणे,वर्गीकरण केलेल्या घरगुती कचऱ्याचे कंपोस्ट खतखड्डा किंवा घरगुती खतखड्डा निर्मिती करून कचऱ्याचे घर किंवा घराच्या परिसरात व्यवस्थापन करणे,परसबाग,पाझरखडा, शोषखड्याद्वारे घरगुतीस्तरावर सांडपाणी व्यवस्थापनावर अभियानात विशेष भर देण्यात आला आहे.
सर्व प्रथम अभियानाची माहिती दवंडी देऊन,गावातील सूचना फलकांवर लावून गावात ग्रामस्थांना माहिती देण्यात येणार आहे.त्यानंतर १ ते २० जाने.या कालावधीत या अभियानाची अंमलबजावणी होणार आहे.२१ ते २४ जाने.या कालावधीत ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीने वैयक्तिक स्तरावर शौचालयाचा वापर,घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणाऱ्या कुटूंबांची पडताळणी करून कुटूंबांची निवड करण्यात येणार आहे.ज्या कुटूंबाची निवड करण्यात येणार आहे.त्यांच्याकडे किंवा परिसरात घरगुती खतखड्डा,परसबाग,वैयक्तिक शोषखड्डा, पाझर खड्डा,वैयक्तिक शौचालय,घरगुती कचराकुंड्या आदी सुविधा असणे आवश्यक आहे.उत्कृष्ट व्यवस्थापन करणाऱ्या कुटुंबांना २६ जाने.२०२५ ला ग्रामसभेमध्ये सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांचे संयुक्त स्वाक्षरीने प्रशस्तीपत्र, श्रीफळ,पुष्प देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. ” स्वच्छ माझे अंगण, “अभियान अंमलबजावणी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक अतुल पारसकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून सर्व पंचायत समितीस्तरावर गटविकास अधिकारी यांना पत्रव्यवहार करण्यात आला असून गावस्तरावर स्वच्छ माझे अंगण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी सांगितले.

