दीपक मोहिते,
राज का रण ?
उंदराची पळापळ सुरू सुरू झाली आहे ; पक्षनिष्ठा गेली तेल लावत…
सत्तांतर झाले की पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सैरभैर होत असतात,त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी देखील ” आपलं काय होणार ?” या भितीमुळे पळ काढत असतात.वसई तालुक्यात सध्या असेच चित्र पाहायला मिळत आहे.महानगरपालिकेचे अनेक वरीष्ठ अधिकारी आपली बदली करून घेण्यासाठी विरार ते मंत्रालय,अशा चपला झिजवत आहेत.तर अनेक कार्यकर्ते व माजी नगरसेवक हवेच्या दिशेने आपली पाठ फिरवण्याच्या तयारीत आहेत.यालाच आपण ” घर फिरलं,की वासेही फिरतात,” अस म्हणतो.
राजकारणात कोण कोणाचा नसतो,या उक्तीप्रमाणे पराभूत पक्षाचे कार्यकर्ते व नगरसेवक देखील त्याला अपवाद नाहीत,हे लवकरच वसई-विरारकर नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे.अनेक माजी नगरसेवक व नगरसेविका जण वेगळ्या वाटेवरचे वाटसरू होण्याच्या तयारीत आहेत.कारण आता निष्ठा,पक्षाविषयी प्रेम व आपुलकी,हे सारे शोभेच्या वस्तू ठरल्या आहेत.कोणी कोणत्या पक्षात जावे,हा ज्याचा, त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.पण ज्या पक्षाने आपल्याला भरभरून दिले,समाजात मनाचे स्थान मिळवून दिले.त्या नेत्यांशी म्हणा किंवा त्या पक्षाशी प्रतारणा करणे,ही गोष्ट मनाला पटणारी नाही.राजकीय पक्षात येजा सतत सुरू असते,किंबहुना तो राजकीय उलढालीचा एक भाग असतो.पण पक्ष व नेत्याची चलती असेपर्यंत पक्षासोबत राहणे व त्यानंतरच्या पडत्या काळात बाडबिस्तरा व विचारधारा गुंडाळून पळ काढणे,ही बाबच मुळी न्यायाला धरून नाही.समुद्रात बुडणाऱ्या जहाजातून उंदीर जसे पळ काढतात,तशी उंदरांची पळापळ सुरू झाली आहे.
असो,वसई तालुक्यात स्वबळावर महानगरपालिका जिंकणे,आता एकाही पक्षाला शक्य होणे नाही.त्यासाठी राष्ट्रीय पक्ष फोडाफोडीच्या राजकारणाला खतपाणी घालत आहे.अनेक नगरसेवक व पदाधिकारी वरकरणी ” आम्ही इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही,” असं सांगत हात वर करत असले तरी प्रत्यक्षात ग्राऊंड लेव्हलवर अनेकांच्या सुप्त हालचाली सुरू आहेत.दरम्यान आज निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे संकेत दिले असून त्यांच्या हालचालींना वेग आला आहे.या निवडणुका साधारणपणे एप्रिल किंवा मे २०२५ दरम्यान होतील,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.त्यामुळे जाने.फेब्रु.व मार्च,या तीन महिन्यात वसईच्या राजकारणात प्रचंड उलथापालथी होण्याची शक्यता आहे.
तसेच महानगरपालिकेतही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हात दगडाखाली आहेत,त्यांच्या मंत्रालयाच्या वाऱ्या वाढल्या आहेत.दस्तुरखुद्द आयुक्त,आपली बदली करण्याच्या प्रयत्नात आहेत.प्रतिनियुक्तीवर आलेले तसेच बदली होऊन गेलेले पण पुन्हा महानगरपालिकेत आले,त्यांची चौकशी केल्यास अनेक अधिकारी अडचणीत येऊ शकतात.त्यामुळे हे अधिकारीदेखील आता पळ काढण्याच्या तयारी आहेत.

