वसंत भोईर,वाडा,
चालू वर्षात प्लास्टिक बंदी स्वयंस्फूर्तीने आणूया आचरणात…
सुख- दुःखाच्या अनेक आठवणींना मनात साठवून २०२४,या सरत्या वर्षांला आनंदाने निरोप देऊन २०२५च्या नवीन वर्षात चांगल्या गोष्टींपासून सुरुवात करुया.प्लास्टिक बंदीचा नवा संकल्प आचरणात आणून मानवी जीवनाच्या आरोग्यास घातक असलेल्या प्लास्टिकचा वापर नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने टाळावा.कायद्याच्या धाकापेक्षा नागरिकांच्या पुढाकाराने प्लास्टिक वापर निश्चितपणाने हद्दपार होऊ शकते.त्यामुळे प्लास्टिक बंदीच्या चळवळीत नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत,सुंदर भारत,मोहिमेला हातभार लावूया.
तालुक्यातील बाजार पेठेत व्यापारी,फेरीवाले,भाजीपाला विक्रेते,मच्छी विक्रेते यांच्याकडून बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या तसेच थर्माकोलचा मोठ्या प्रमाणात खुलेआम वापर होत आहे.यामुळे स्वच्छ भारत,सुंदर भारत या मोहिमेला गालबोट लागत आहे.सरकारने घेतलेल्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची पायमल्ली होत आहे.प्लास्टिकचा सर्रास वापर करणा-यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.सरकारच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले आहे.परंतू निर्णयाची अंमलबजावणी करण्यात शासन मात्र कमी पडत असल्याचे दिसत आहे.
प्लास्टिक अथवा थर्माकोलपासून ताट,कप, प्लेट्स,ग्लास,काटे,वाटी, चमचे,भांडे,स्ट्रॉ,नॉनवोवन बॅग्स,प्लास्टिक पाऊच,सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, धान्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक आणि वेस्टन, उत्पादन,साठवणूक,घाऊक व किरकोळ विक्री,आयात आणि वाहतुकीस संपूर्ण बंदी आहे.अशा वस्तूंचा विक्री, वाहतूक व वापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यास शासन आखडता हात घेत आहे.सुरुवातीला प्रशासनाने कारवाईचा कडक बडगा उगारताच कागदी, कापडी पिशव्या घेऊन खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडत होते.विक्रेते, दुकानदारांनीही प्लास्टिक पिशवी देणे,नाकारत होते. हळूहळू कारवाईचा वेग मंदावताच कायद्याची पायमल्ली करत प्लास्टिकचा वापर पुन्हा सर्रास होऊ लागला आहे.
राज्यात प्लास्टिकच्या ५०
मायक्रॉन्सपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला आहे.मात्र, त्याची म्हणावी तेवढी काटेकोरपणे कारवाई होत नसल्याने,अजूनही काही दुकानदार,हॉटेल मालक,किरकोळ विक्रेते यांच्याकडून ग्राहकांना प्लास्टिक पिशव्यांमधून सामान देत असतात.प्लास्टिक बंदीचा कायदा योग्य रित्या अमलात आणण्यासाठी नागरिकांचा पुढाकारही तितकाच महत्वाचा आहे. २०२५ या नवीन वर्षात प्लास्टिक बंदीचा नवा संकल्प करुन स्वच्छ भारत,सुंदर भारत या मोहिमेला हातभार लावूया.

