जव्हार,प्रतिनिधी,
कौलाळे गटात रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार,
तालुक्यातील कौलाळे गटात एकनाथ दरोडा यांच्या संकल्पनेतून बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी तीन जिल्ह्यातील स्पर्धकांनी हजेरी लावली होती.तर पंचक्रोशीतील दोन हजार शेतकऱ्यांनी मनसोक्तपणे स्पर्धेचा आनंद घेतला.गेल्या तीन वर्षांपासून न्यायालयाने बंदी हटवल्याने महाराष्ट्रामध्ये पुन्हा बैलगाडा शर्यती जोमात सुरू झाल्या आहेत.या निर्णयानंतर गेल्या तीन वर्षांपासून पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुकाच्या गारादेवी मैदानावर पुन्हा एकदा शर्यतीचा थरार बघायला मिळाला.
दरम्यान झाप ग्रामपंचायत सरपंच व बहुजन विकास आघाडी पक्षाचे जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांच्या संकल्पनेतून काल कौलाळे गटात बैलगाडा शर्यत आयोजीत करण्यात आली होती.यासाठी पालघर, ठाणे व नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील शेतकरी आपली बैल जोडी घेऊन स्पर्धेत हजर झाले होते.यावर्षी एकूण ९० बैलगाड्यां सहभागी झाल्या होत्या.लहान मुले,तरूण वर्ग व जेष्ठ नागरीक यांचा सहभाग होता.या सर्वांनीच सुट्टीचा दिवस म्हणून शर्यतीचा मनमुराद आस्वाद घेतला. यावर्षी ५०० ते २००० रू. पर्यंत बक्षिसे ठेवण्यात आली होती.
सदर स्पर्धेचे आयोजक एकनाथ दरोडा यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं कि ” स्थानिक बाजारपेठत बैलांच्या किमतीला योग्य भाव मिळावा. तसेच शेतकरी परंपरा जोपासुन जास्तीत जास्त तरूणवर्ग शेतीकडे व्यवसायाकडे आकर्षित व्हावा.तसेच लोप होत चाललेल्या ग्रामिण संस्कृतीला प्रोत्साहन देणे व वृद्ध बैलांना कत्तलखान्यापासून वाचवणे, असा आमचा शर्यत आयोजीत करण्याच्या मुख्य उद्देश असतो.यावेळी त्यांच्यासोबत शर्यतीचे अध्यक्ष प्रकाश करनोर,उपाध्यक्ष नारायण करनोर,खजिनदार संजय भला सोबत नांदगाव ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश कोरडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

