नवीन पाटील, सफाळे,
३१ डिसें. सेलिब्रेशनसाठी केळवे बीच सज्ज…
३१ डिसे.साजरा करण्यासाठी पालघर तालुक्यातील केळवे बीचला पर्यटकांची पसंती मिळत असून मुंबई, ठाणे, गुजरात आदी भागातून शेकडो पर्यटक नव्या वर्षाच्या स्वागतासह गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी येथे मोठी गर्दी करणार आहेत.याकाळात कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,यासाठी केळवे सागरी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे.
केळवारोड स्थानकाच्या पश्चिमकिनारपट्टी भागातील निसर्गरम्य आणि स्वच्छ व सुंदर समुद्र लाभलेल्या केळवे बीचला वर्षभर पर्यटकांची मोठी गर्दी होत असते.उद्या मंगळ.३१ डिसें.२०२४ या वर्षांचा शेवटचा दिवस असून दुसऱ्या दिवशी बुधवार आल्याने सरत्या वर्षाला गुड बाय व नव्या नवर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांची थोडी अडचण झाली आहे.मात्र त्यातही आनंदाचा पारा हा उंचावलेलाच आहे.
पालघर जिल्ह्यासह मुंबई, ठाणे,गुजरात ल,आदी भागांतूनही पर्यटक प्रचंड संख्येने येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.बीच परिसरात छोटे-मोठे असे ६० ते ७० रिसॉर्टस असून विविध प्रकारचे व्हेज,नॉनव्हेज पदार्थांनी पर्यटकांना आकर्षित करण्यास ते सज्ज झाले आहेत.केळवे बीचला शासनाकडून पर्यटन स्थळाचा दर्जा मिळून विकासासाठी कोट्यावधी रु.चा निधी मंजूर झाल्याने काही प्रमाणात विकासकामे झाली आहेत.
नाताळच्या सुट्टीपासून आपल्या कुटुंबासह येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.निसर्गरम्य आणि स्वच्छ समुद्रामुळे पर्यटक येथे आकर्षित होत असतात.परंतु काही मद्यधुंद तरुणाच्या टोळक्यांमुळे तरुणींची छेडछाड करणे, सुरूच्या बागेत धिंगाणा घालणे,भांडणे,हाणामाऱ्या यामुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत असतो. मात्र,केळवे येथे काही वर्षांपूर्वी नव्याने सुरू झालेल्या केळवे सागरी पोलीस ठाण्यामुळे येथील पर्यटनाला मोठी शिस्त लागली असून बिचवर मद्यपान करणे,धांगडधिंगा घालणे, महिलांची छेडछाड करणे अशा प्रकारांना आळा बसला आहे.पोलिसांकडून होणाऱ्या कडक कारवाईमुळे येणाऱ्या राडेबाज टोळक्यांचे केळवे बीचवर येणे बंद झाले आहे.पूर्वी या काळात होणारी भांडणे,मारामाऱ्या,बीचवर वाजवण्यात येणारे बेंजो,लाऊडस्पीकर यांचे कानठळ्या बसविणारे आवाज थांबले गेले.तसेच तरुणांच्या टोळक्यांकडून पर्यटकांशी होणारे गैरवर्तनही मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे बीचवर हल्ली पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे.
नाताळच्या सुट्टीमुळे केळवे समुद्रकिनारी आपल्या कुटुंबासह येणारे पर्यटक वाढले असून येथील निसर्गरम्य परिसरचा आणि समुद्रात पोहोण्याचा सर्वच मनमुरादपणे आनंद घेत असतात.अशातच आता ३१ डिसें.च्या सेलिब्रेशनसाठी येथील रिसॉर्ट्स आणि समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलणार आहे.त्यादृष्टीने बीच परिसरात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विजेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
कोट –
केळवे बीच व परिसरात पेट्रोलिंग सुरू करण्यात आले असून समुद्रातील धोकादायक भागात होर्डिंग लावण्यात आले आहेत.हॉटेल व्यवसायिकांनाही सीसीटीव्ही कॅमेरे सक्रिय करण्यासोबत पर्यटकांची माहिती घेणे, मद्यपान करून धिंगाणा करू नये,अशा सूचना देण्यात आल्या आहेत.ड्रंक अँड ड्राईव्हच्या दृष्टीने विविध ठिकाणी तपासणीनाके उभारले आहेत.वाहतूक कोंडी होऊ नये,यासाठी वाहतुकीत विशेष बदल करण्यात आले आहेत.एकंदरीतच सेलिब्रेशनमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदाभवू नये,म्हणून विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
– विजया गोस्वामी, स.पो.नि.केळवे सागरी पोलीस ठाणे

