सद्दाम शेख,मोखाडा,
महिलेचा मृत्यू,हा व्यवस्थेने घेतलेला बळी- माजी आ. सुनील भुसारा,
मोखाडा तालुक्यातील कोलध्याचा पाडा येथे आशा भुसारा या महिलेच्या प्रसूती नंतर मृत्यू झाला.तिला उपचारासाठी मोखाडा ते जव्हार आणि जव्हार हून नाशिक असा प्रवास करावा लागला.त्यामुळे मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने हा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे तर आम्ही दोन दिवस अगोदर दाखल करूनही दिरंगाई केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.
माजी आ.सुनील भुसारा यांनी या आज मयत महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि सांत्वन केले.तसेच नातेवाईकांडून या घटनेची माहिती घेतली,यावेळी त्यांनी महिलेचा झालेला मृत्यू हा व्यवस्थेने घेतलेला बळी असल्याचे सांगितले.या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे केली आहे.
यावेळी पत्रकारांशी बोलताना भुसारा यांनी सांगितले की,आम्ही जव्हार मोखाडा या भागातील आरोग्य व्यवस्था बळकट होण्यासाठी प्रयत्न केले,मात्र अनेकदा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या शासनाने केल्या.त्यामुळे आज तालुक्यात मनुष्यबळाची कमतरता आहे.बदली होऊन गेलेल्या डॉक्टरांच्या रीक्त जागा त्वरित भरण्यात येत नाहीत.जोवर रिक्त जागेवर नवीन डॉक्टर येत नाहीत,तोवर त्यांना सोडण्यात येऊ नये, अशी आमची मागणी आहे.मात्र ही व्यवस्था बरबटलेली आहे,त्याना लोकांच्या जीवाशी देणे घेणे नाही.आज मोखाडा ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्ह्याचा दर्जा तसेच जव्हार रुग्णालय जिल्हा रुग्णालय व्हावे,यासाठी अनेकदा विधानसभेत प्रश्न उपस्थित केले.मात्र कागदीघोडे नाचावण्यात हे सरकार मश्गूल होते.त्यामुळे आशा भुसारा या महिलेचा झालेला हा मृत्यू म्हणजे व्यवस्थेने घेतलेला बळी आहे.यावेळी त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ रामदास मराड आणि वैद्यकीय अधिक्षक डॉ भरत महाले यांच्याकडून फोनवरून माहिती घेतली तसेच समिती स्थापन करून या घटनेची चौकशी व्हायला हवी,अशी मागणी देखील यावेळी केली.

