वसंत भोईर,वाडा,
लाडक्या बहिणींना दिलासा,शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी ?
राज्यातील नवीन सरकारने कारभाराला सुरुवात केली आहे.हिवाळी अधिवेशनही नुकतेच पार पडले.लाडक्या बहिणींना खात्यात डिसें.चा हप्ता येण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता सरकारने जाहीररित्या दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार ?असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
महायुती सरकार राज्यात आल्यास २०१९ पासून ज्या शेतकऱ्यांवर कर्ज आहे अशांची सरसकट कर्जमाफी करू,अशी घोषणा करण्यात आली होती.तसे घोषणापत्र सुद्धा भाजपतर्फे प्रसिद्धीस देण्यात आले होते.
हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती.मात्र तसे झाले नाही, सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी जाहीर करून एकदाचा सातबारा कोरा करावा,अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
राज्यात २००२ पासून आजपर्यंत तीन वेळा कर्जमाफी जाहीर करण्यात आल्या.यात कधी शेताच्या आकारमानावर तर कधी किमान रक्कम ठरवून कर्जमाफी घोषणा करण्यात आली.मात्र आजही शेतकरी कर्जमुक्त होऊ शकलेला नाही. विशेष करून कोकणातील शेतकऱ्यांना मागील तीनही कर्जमाफीचा फायदा होऊ शकलेला नाही.आता नव्याने स्थापन झालेल्या सरकार मतदार म्हणून बळीराजांनी भरभरून मतदान करीत सरकार निवडून दिले आहे. आता त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, अशी प्रतिक्रिया शेतकरी किशोर पाटील यांनी व्यक्त केली.

