नवीन वर्षातही वाहनचालकांच्या नशिबी वाहतूककोंडीचं,
मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या व्हाईट टॉपिंग प्रकल्पाचे काम अनियमित व नियोजनशून्य पद्धतीने, होत असल्यामुळे वाहनचालकांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
एप्रिल २०२३ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाचे काम २०२५ मध्येही पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत.परिणामी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिक यांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.
महामार्गावरील १२१ कि.मी.अंतराचे सिमेंट काँक्रिटीकरण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतले आहे.बहुतांश काम पूर्ण झालेले असले तरी गुणवत्तेच्या अनेक समस्या आणि उर्वरित प्रलंबित कामामुळे महामार्गावर वारंवार ” वर्क प्रोग्रेस,”चे फलक झळकत आहेत.त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. विशेषतः वसई, नालासोपारा आणि बोईसर भागातील नागरिकांना या गैरसोयीचा मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हे काम निर्मल बिल्ट इन्फ्रा प्रा. लि.या कंपनीकडे सोपवले आहे.मात्र,ठेकेदाराच्या गैरव्यवस्थापनामुळे रस्त्याचे काम अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. प्रकल्प सुरू झाल्यापासून धुरळा,खड्डे,आणि अपघातांचा धोका,यामुळे नागरिक त्रस्त आहेत.यावर्षी पावसाळ्यात काम थांबवण्यात आले होते, परंतु पावसाळ्यानंतर उर्वरित काम सुरू होताच नागरिकांना पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
महामार्गावर मुख्य रस्त्याचे व्हाईट टॉपिंग जवळपास पूर्ण झाले असले तरी आता प्राधिकरणाने सेवा रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू केले आहे. परिणामी,मुख्य रस्त्यावरील वाहतूक आणि सेवा रस्त्यावरील काम यामुळे दोन्हीकडून अडथळे निर्माण होत आहेत.अनेक नागरिक आणि वाहनचालकांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत आहे.
सन २०२५ च्या सुरुवातीस देखील ही परिस्थिती बदलण्याची चिन्हे नाहीत. अनियमितपणे काम करणे, ठेकेदारांचा मनमानी कारभार, आणि प्रशासनाचा सुस्त कारभार यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.स्थानिक स्वराज्य संस्था आणि आमदारांनी एकत्रितपणे ठोस उपाययोजना केल्याशिवाय या ज्वलंत समस्येचा निपटारा होणार नाही,असे वाहनचालकांचे म्हणणे आहे.

