दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
कालच्या आक्रोश मोर्चाने महायुती सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगली गेली..
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी संशयाची सुई धनंजय मुंडे यांच्या अवती भोवती फिरत असूनही त्यांना मंत्रिमंडळातून काढण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तयार नाहीत.त्यामुळे त्यांच्या सरकारची प्रतिमा डागाळत चालली आहे.काल बीडमध्ये प्रचंड आक्रोश मोर्चा निघाल्यानंतर सरकारने फरार आरोपींची संपत्ती व हवेत गोळीबार करणाऱ्या गुंडांच्या रिव्हॉल्व्हरचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले.सरकारची ही कारवाई लोकांच्या डोळ्यात धूळ फेकणारी आहे,असे बीडवासीयांचे म्हणणे आहे.धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणे व वाल्मिक कराड व त्यांच्या टोळीला जेरबंद करणे,अशा दोन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.त्या मागण्याची पूर्तता करण्यास फडणवीस सरकार सतत चालढकल करत आहे.त्यामुळे या सरकारविरोधात राज्याच्या जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

या संवेदनशील प्रकरणी फडणवीस सरकार,ज्या पद्धतीने वागत आहे,ते वागणे,न्यायाला धरून नाही.एक होतकरू तरुण आपले कर्तव्य बजावताना गुंडांच्या दहशतीला बळी पडतो आणि सरकार हत्येतील गुंडांना पाठीशी घालते,ही बाब फुले,आंबेडकर व शाहू महाराजांच्या पुरोगामी महाराष्ट्राला शोभेशी नाही.सोळा वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी ताजमहल हॉटेलमध्ये पाहणी करण्यास गेलेले तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सोबत एका सिनेनिर्मात्याला नेल्यामुळे त्यांच्यावर भाजपसह अन्य राजकीय पक्षांनी टीकेची झोड उठवली होती.विरोधकांच्या प्रखर टिकेनंतर विलासराव देशमुख यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा दिला होता.त्यावेळी गृहमंत्रीपदी असलेल्या आर.आर.पाटील यांनाही आपल्या बेताल वक्तव्यामुळे राजीनामा द्यावा लागला होता.पण आज आपण काय पाहत आहोत.एका तरुणाचा दिवसाढवळ्या खून होतो,त्यांचे कुटुंब उघड्यावर पडते.त्यांची मुलगी न्याय मिळावा,यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून कंठशोष करत आहे.पण या असंवेदनशील सरकारच्या हृदयाला पाझर फुटत नाही.सरकारच्या या वागण्याचा निषेध करण्यासाठी निघालेल्या आक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी बीड जिल्ह्यातील मायमाउलींनी काल आपल्या घरातील चुली पेटवल्या नाहीत.पण सरकारला या घटनेतील दाहकता समजू शकली नाही.पीडित कुटुंबाची भेट घेणे,देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी टाळले.सुरेश धस,हे एकमेव भाजपचे आमदार वगळता एकही भाजपचा नेता बीडकडे फिरकला नाही.सरकार म्हणून त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही.परभणी येथे न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी,या तरुणाचा झालेला मृत्यू,संतोष देशमुख यांची झालेली निर्घृण हत्या व सरकारची निष्क्रियता,याची इतिहासात ” एक लांच्छनास्पद काळी घटना,” अशी नोंद होणार आहे.या सर्व घडामोडीमुळे आपले राज्य हे आता बिहार होण्याच्या मार्गाने जाऊ लागले आहे,असे वाटू लागले आहे.

