सद्दाम शेख,मोखाडा,
वेळीच उपचार न मिळाल्यामुळे महिलेचा मृत्यू, नातेवाईकांचा डॉक्टर व नर्सेसवर आरोप,
पालघर जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आरोग्य सेवेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे.अतिग्रामीण भागातील भयानक वास्तव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.एका गरोदर मातेला प्रसूतीनंतर रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाल्याची घटना मोखाड्यात घडली आहे.परंतु डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेच्या कुटूंबियाने केला आहे.
मोखाडा तालुक्यापासून १५ कि.मी.अंतरावर असलेल्या मोऱ्हांडा ग्रामपंचायतमधील कोलद्याचापाडा येथील गरोदर माता आशा नंदकुमार भुसारे, वय ( २२ वर्ष ) हीला प्रसूतीसाठी २५ डिसें.रोजी पहाटे ३.०० वाजता मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु यावेळी दिवसभर कोणताही उपचार न करता या महिलेला वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येजा करायला लावली.त्यानंतर आता प्रसूती होईल,नंतर होईल,यामध्ये दुसरा दिवसही निघून गेल्याचे महिलेच्या कुटूंबियांनी सांगितले.२६ तारखेला सकाळी ९.०० च्या दरम्यान प्रसूती होऊन या महिलेने नवजात बालकाला जन्म दिला.परंतु यानंतर तिला प्रचंड रक्तस्राव होऊ लागला.अक्षरश एक तास हे रक्तस्राव सुरु असल्याचे कुटूंबियांनी सांगितले.त्यानंतर तीला पुढील उपचारासाठी जव्हार कुटीर रुग्णालयात पाठवण्यात आले.तेथे चार बाटल्या रक्त तिला देण्यात आले,तरी देखील रक्तस्राव सुरूच होता.रक्तस्राव थांबवण्यासाठी उपचार करूनही थांबत नसल्याने पुढील उपचारासाठी नाशिक सिव्हिल येथे पाठवण्यात आले.
दरम्यान रस्त्यातच तिचा मृत्यू झाला,या घटनेने पंचक्रोशीत प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.आणखी किती दिवस आदिवासींना किड्यामुंग्या प्रमाणे मरू देणार आहात का ? असा संतप्त सवाल,यानिमित्ताने विचारला जात असून दोषींवर कडक कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
—————————————————————–
बाईट –
माझ्या पत्नीची डिलिव्हरी नॉर्मल झाली,परंतु डॉक्टर व नर्स यांनी चुकीच्या पद्धतीने उपचार केल्यानेच रक्तस्राव झाला आहे.रक्तस्राव झाल्यानंतरही खूप विलंब लावला,वेळीच माझी पत्नी सिव्हिल रुग्णालयात पोहचली असती तर ती वाचली असती,याची योग्य ती चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी.”
-नंदकुमार भुसारे ( मयत महिलेचे पती )
—————————————————————–
बाईट –
प्रसूती झाल्यानंतर काही वेळाने गर्भपिशवी कडक होणे गरजेचे असते.अन्यथा रक्तस्राव सुरु होतो.यावेळी रक्तस्राव थांबवण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न केले.तीला तात्काळ रक्ताच्या बॉटलही देण्यात आल्या,परंतु तिचा रक्तस्राव थांबत नव्हता.यावेळी गर्भपिशवीचे ऑपरेशन करणे,गर्भपिशवी काढून टाकणे,अशा शस्त्रक्रिया कराव्या लागतात.परंतु आपल्याकडे योग्य त्या सुविधा नसल्याने नाशिक सिव्हिलला पाठवण्यात आले.परंतु तिचा रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला.”
डॉ.भरत महाले.वैद्यकीय अधीक्षक ( मोखाडा ग्रामीण रुग्णलाय )
—————————————————————–
बाईट –
अती रक्तस्राव झाल्याने आशा भुसारे यांना रक्त देणे आवश्यक होते.त्यामुळे तातडीने जव्हार येथील जव्हार येथील कुटीर रुग्णालयात पाठवून तिला रक्त दिले.पण रक्तस्राव थांबत नसल्याने तिला पुढे नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते.परंतु अती रक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला.”
– डॉ.भाऊसाहेब चत्तर, तालुका वैद्यकीय अधिकारी,
मोखाडा..

