दीपक मोहिते,
राजकारणाची अधोगती,
संतोष देशमुख हत्या प्रकरण : अजित पवार यांना घेरण्याच्या हालचाली,
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना अटक व्हावी,यासाठी,सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व भाजपचे आ.सुरेश धस यांनी जोरदार मोहीम उघडली आहे.आतापर्यंत या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड व त्यांना पाठीशी घालणाऱ्या धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले होते.पण आ.धस यांनी अचानकपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात संशयाची पाल चुकचुकू लागली आहे.आ.धस यांनी अचानक अजित पवार यांच्याविरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केल्यामुळे आता राजकारण ढवळून निघाले आहे.भाजपचा आमदार असताना धस या प्रकरणी आक्रमक भूमिका घेऊ लागल्यामुळे त्यांना कोणाची फूस आहे,अशी चर्चा सुरू झाली आहे.आ.धस हे कोणाच्या तरी सांगण्यावरून अजित पवार यांना लक्ष्य करत असावेत,असा संशय सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात असलेले आरोपी अद्याप पोलिसांना सापडत नाहीत,त्यामुळे प्रकरणाचा तपास बीड पोलिसांकडून काढून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला आहे.या विभागाचे अधिकारी सध्या वेगवान तपास करत आहेत.पण आता हे प्रकरण अजित पवार यांच्यावर शेकवण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून आले आहे.धनंजय मुंडे हे याप्रकरणात चांगलेच अडकले असून,सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या प्रकरणातील आरोपी गजाआड व्हायला पाहिजेत,यासाठी बीड मध्ये दाखल होत आहेत.आ.धस यांनी तर थेट अजित पवार यांचा राजीनामा मागितल्यामुळे सगळ्यांच्या भुवया वर गेल्या आहेत.आ.धस ज्या पद्धतीने या प्रकरणी धाडस करत आहेत,त्यावरून भाजपमधील अदृश्य शक्ती त्यांच्या पाठीशी असाव्यात,अशी शक्यता व्यक्त होत आहे.या सर्व प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांच्या टीकेचे धनी होत असल्यामुळे महायुतीमधील काही शक्ती सक्रिय झाल्याचे समजते.माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,यांचा गळा घोटल्यानंतर आता अजित पवार यांना जाणीवपूर्वक अडकवण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.तशी खदखद अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली आहे.त्यांच्यावरही धस व जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी पलटवार करण्यास सुरुवात केली आहे.या सर्व घडामोडीमुळे संतोष देशमुख हत्याप्रकरणाला वेगळे वळण लागता कामा नये.या प्रकरणाचा वापर अजित पवार यांना घेरण्यासाठी होता कामा नये,असे बीडवासियांची मागणी आहे.संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा,यासाठी उद्या सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे.तर १ जाने. रोजी जाम आंदोलनही करण्यात येत असल्याचे जाहीर झाले आहे. आरोपीना अटक करण्यास विलंब होत असल्यामुळे बीड जिल्ह्यात नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.

