जव्हार,प्रतिनिधी
विक्रमगड येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराला सुरुवात,
चिकित्सक समूहाचे एस.एस. आणि एल.एस.पाटकर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स व व्ही.पी.वर्दे कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स,गोरेगाव पश्चिम मुंबई यांच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिट २५ तर्फे छत्रपती विद्यालय,चरी बुद्रुक, ता.विक्रमगड येथे २४ ते ३० डिसे. २०२४ या कालावधीत निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिराचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील समस्यांचे निरीक्षण करून त्यावर उपाय शोधणे आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना विकसित करणे अशी आहे.
शिबिरामध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक सत्रे आयोजित करण्यात आली असून,विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी या माध्यमातून संधी देण्यात आली आहे.शिबिराच्या पहिल्या दिवशी प्रमुख सत्रात सामाजिक कार्यकर्ते मनोज कामडी यांनी ” पालघर जिल्ह्यातील महिलांच्या समस्या,महिला सक्षमीकरण व सध्याची सामाजिक स्थिती,” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
कामडी यांनी आपल्या बोलीभाषेतून विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध वास्तवदर्शी उदाहरणे दिली. महिलांचे शिक्षण,आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक बदल,यावर त्यांनी विशेष भर दिला.पालघर जिल्ह्यातील महिलांच्या समस्या उघड करताना,त्यांनी विद्यार्थ्यांना परिस्थिती सुधारण्यासाठी ठोस भूमिका घेण्याचे आवाहन केले.त्यांच्याशी झालेल्या संवादाने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाण निर्माण झाली.

या सत्राला राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. अमिता कोळी,तसेच सहकारी प्राध्यापक संतोष केसकर, गजानन आडे आणि पुष्कराज भोजने,आदी सहभागी झाले होते एनएसएस विद्यार्थी व प्रतिनिधींसह शिबिरात मोठ्या संख्येने राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
या सात दिवसीय शिबिरात ग्रामीण भागातील आरोग्य, स्वच्छता,शिक्षण,महिला सक्षमीकरण,अंधश्रद्धा निर्मूलन,जैवविविधता संवर्धन, व व्यसनमुक्ती यांसारख्या विषयांवर कार्यशाळा व उपक्रम राबवण्यात येणार आहेत.विद्यार्थ्यांना श्रमदान, गटचर्चा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे स्थानिक समस्यांवर चर्चा करण्याची संधी दिली जाईल.या शिबिराद्वारे विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील जीवन व समस्यांची ओळख होईल. सामाजिक समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या नेतृत्वगुणांना वाव मिळणार आहे.विविध सत्रांमधून ग्रामीण विकासासाठी युवकांनी योगदान देण्याचे महत्त्व अधोरेखित केले जाईल.राष्ट्रीय सेवा योजनेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीसह स्वावलंबन आणि नेतृत्वगुण विकसित होतील.तसेच ग्रामीण भागातील प्रगतीला गती मिळेल.

