दीपक मोहिते,
” राज्याची अधोगती,”
संतोष देशमुख हत्या ; आपल्या लाडक्या बहिणीचे कुंकू पुसणाऱ्याना नियती सोडणार नाही,
राज्यकर्त्यांच्या नालायकपणामुळे बीड जिल्ह्याची ओळख,” गुन्हेगारीचा जिल्हा,” अशी झाली आहे.जिल्ह्यातील गुन्हेगारीची प्रकरणे एकामागोमाग बाहेर येत असूनही आपले मायबाप सरकार जागे व्हायला तयार नाही.त्यांच्याच पक्षाचे आ.सुरेश धस यांनी सरकारची लक्तरे अक्षरशः वेशीला टांगली आहेत.पण सरकार त्यातून काही बोध घ्यायला तयार नाही.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप करत,त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली आहे.त्यांनी ही मागणी करताना मुंडे यांचे वाल्मिक कराड यांचे एकमेकांशी कसे घनिष्ट संबंध आहेत,हे पुराव्यानिशी दाखवून दिले,पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना पाठीशी घालत आहेत.फडणवीस हे दररोज प्रसिद्धी माध्यमांसमोर येऊन ” कोणालाही सोडणार नाही,गुन्हेगारीची पाळमुळे खोदून काढणार,” अशा घोषणा करताना पाहायला मिळतात.पण ते या प्रकरणी जाणीवपूर्वक डोळेझाक करण्यात धन्यता मानत आहेत.या विषयावर देवाभाऊंचे भक्तही मूग गिळून बसले आहेत.आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची वाताहत झाली.त्यांची मुलगी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे,असा टाहो फोडत आहेत,पण मुर्दाड राजकर्त्यांच्या हृदयाला पाझर फुटत नाही.एक तरुण,अन्यायाविरोधात लढताना जीवानिशी मारला जातो.त्याच्या कुटुंबाचे क्षणार्धात ” होत्याचे नव्हते,” पण आपले सरकार या ” आका,” ला हात लावायचे धाडस करत नाही,त्यामुळे या सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.संतोष देशमुख यांची पत्नी व आई,ही तुमची लाडकी बहीण नाही का ? आता सरकार या कुटुंबाला सरकार आर्थिक मदत देणार आहे.पण त्यांना आर्थिक मदत नको आहे,त्यांना न्याय हवा.तो जर तुम्ही देवू शकत नसाल,तर लाडक्या बहिणीचे जे कौतूक तुम्ही करत आहे,तो बाजार बंद करा.आपल्या बहिणीचे कुंकू पुसण्याचे काम करण्याचे काम तुमच्या लोकांकडून होत असेल,तर पंधराशे रू.काय चाटायचे आहेत ?
बीड हा जिल्हा पूर्वी शेती/बागायती जिल्हा म्हणून नावारूपाला आला होता.आज या जिल्ह्यात रिव्हॉल्वर्सचे पीक आले आहे.या जिल्ह्यात १ हजाराहून अधिक रिव्हॉलर्स असल्याचे अंजली दमानिया यांनी उघडकीस आणले आहे.एवढ्या मोठ्या संख्येने परवाने कोणी दिले ? त्याच्या शिफारशी कोणी केल्या ? हे बीडवासीयांना कळले पाहिजे.या सर्व घटनांमुळे पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा पार काळवंडला गेला आहे.माणुसकीची जरा जरी चाड असेल,तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणातील ” मुख्य आका,” ला हात लावून दाखवावे,अशी बीडवासीयांची मागणी आहे.

