दिपक मोहिते,
लाचखोर वनपरिक्षेत्र अधिकारी एसीबीच्या जाळ्यात,
वनविभागातील आणखी एक बडा अधिकारी आज लाचलुचपत विभागाने रचलेल्या जाळ्यात अडकला.संदीप तुकाराम चौरे,असे या वनअधिकाऱ्याचे नावं असून तो वनविभागाच्या मांडवी कार्यालयात वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर कार्यरत होता.जप्त मिळकतीचा वस्तुस्थितीदर्शक अहवालाचा कागदोपत्री मोबदला म्हणून चौरे याने तक्रारदाराकडून २० लाख रु.च्या लाचेची मागणी केली होती.त्यापैकी १० लाखाची लाच स्विकारताना लाचखोर चौरे एसीबीच्या जाळ्यात सापडला.या कारवाईत एसीबीने चंद्रकांत पाटील व अन्य एका अनोळखी इसमालाही ताब्यात घेतले आहे.यापूर्वीही एसीबीने लाचखोरी प्रकरणात वसईतून वनविभागाच्या एका बड्या अधिकाऱ्याला अटक केली होती.या पार्श्वभुमीवर वनविभाग लाचखोरीच्या दलदलीत रुतल्याचे स्पष्ट होत आहे.

वसई तालुक्यातील गाव ससुनवघर हद्दीत ” विस्तारित सासुपाडा,” गावठाण या ठिकाणी सर्वे नं.३७१ ( नवीन सर्वे क्र.१४१ ) मधील ७ गुंठे ही मिळकत वनविभाग क्षेत्रात येते.सन २००७ मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वनविभाग,बोरिवली पश्चिम मुंबई यांनी ही मिळकत ताब्यात घेऊन सील केली होती.तक्रारदार यांच्या जप्त मिळकतीच्या प्रकरणांमध्ये लोकसेवक एस.टी.चौरे वनक्षेत्रपाल,मांडवी यांनी वरिष्ठ कार्यालयास सादर करावयाचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल सहा.वनसंरक्षक,घोलविरा, डहाणू यांच्याशी बोलून तक्रारदार यांच्या बाजूने देण्याकरिता व तक्रारदार यांची जप्त मिळकतीवर ताबा मिळवून देण्याकरिता कागदोपत्री मदत करण्याचा मोबदल्यात ६ नोव्हें.२०२४ रोजी २० लाखांच्या लाचेची मागणी केली.याबाबत तक्रारदार यांनी १८ नोव्हें. २०२४ रोजी ला.प्र.वि. पालघर येथे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने १९ डिसें.२०२४ रोजी करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये तक्रारदार यांच्या बाजूने अहवाल देण्याचे व जप्त मिळकतीवर पुन्हा ताब्यात मिळवून देण्याकरिता आवश्यक कागदोपत्री मदत करण्याची तयारी चौरे याने दाखवली.तसेच २० लाखाच्या लाचेची मागणी केली.आज ठरलेल्या २० लाखापैकी १० लाखाचा हफ्ता स्विकारण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी चौरे व त्याचा हस्तक चंद्रकांत पाटील हे दोघे वाहनातून ( एमएच-48 सीके-3741 ) वसई पुर्वेतील एव्हरशाईनसिटीतील ब्रॉडवे कडे आले होते.परंतू एसीबीने रचलेल्या जाळ्यात ते अडकले. वनअधिकारी एस.टी.चौरे, चंद्रकांत पाटील ( खाजगी इसम ) आणि अनोळखी इसम यांच्याविरुद्ध मांडवी पोलीस ठाण्यात गु.र.नं.३२८/२०२४ भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा सन १९८८ ( सुधारित अधिनियम २०१८) चे कलम ७,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक हर्षल चव्हाण,पोलीस निरीक्षक,शिरीष चौधरी,पो. हवा.भगत,पो.हवा.भोये.पो. हवा.धारणे,पो.हवा. सुमडा,पो.अं.लोहरे,पो.अं. धवडे,पो.अं/गवळे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

