नदीम शेख,पालघर,
अवघ्या बारा तासात गुन्हेगार जेरबंद,
सफाळे पश्चिमेस
आगरवाडी नजीक असलेल्या विळंगी येथे तारा सदानंद भोईर यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरीने चोरी करणाऱ्या आरोपीस अवघ्या १२ तासात जेरबंद करण्यात आले. केळवे सागरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत वेगाने कारवाई करून आरोपींना गजाआड केले.
तारा सदानंद भोईर,६५ या आपल्या मोठे घर आळी विळंगी येथे घरात काम करत असताना अनोळखी इसमाने त्यांच्या अंगावर व चेहऱ्यावर कपडा टाकून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, बोरमाळ व कानातील कुड्या असा एकूण २ लाख ३१ हजार रु.चे दागिने पळवून नेले.ही चोरी करताना आरोपीने त्यांना मारहाण करून पळ काढला.या घटनेची तक्रार केळवे सागरी पोलीस ठाण्यातमध्ये करण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याची गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर व प्रभारी अधिकारी केळवे सागरी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांनी घटनास्थळी भेट दिली.त्यानंतर तपासाची चक्रे फिरल्यानंतर गोस्वामी व त्यांच्या तुकडीने गुन्हेगारास बारा तासात जेरबंद केले. त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत केला.अत्यंत शिताफीने तसेच जलदगतीने तपास लावल्याबद्दल केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
