दीपक मोहिते,
भयावह स्थिती,
संतोष देशमुख हत्या ; त्यांची पत्नी व कन्येचा आक्रोश ” लाडक्या बहीण योजने,” ला छेद देऊन गेला…
काल विधानसभा अधिवेशनाचे सूप वाजले.या अधिवेशनात किती काम झाले,याचा लेखाजोगा मांडण्याऐवजी सरकारची लक्तरे कशी वेशीला टांगली गेली,याचा लेखाजोगा मांडण्याची गरज आहे.हे अधिवेशन खऱ्या अर्थाने भाजपचे आ.सुरेश धस यांनी गाजवले.हे सरकार गुन्हेगारी जगताला कसे पाठीशी घालते,गुन्हेगाराना कसे संरक्षण देते,यावर त्यांनी आक्रमकपणे प्रकाशझोत टाकला.स्व.गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर गुन्हेगारी नाहीशी व्हावी,यासाठी खस्ता खाल्या.आज त्यांची विद्यमान पिढी गुन्हेगारीला खतपाणी घालत असल्याचा थेट आरोप त्यांनी आपल्या भाषणात केला.या अधिवेशनात एक भाजपचा आमदार आपल्या सरकारचे अपयश उजेडात आणत होता,यावेळी सत्ताधारी पक्षाचे मंत्री व आमदार हे निमूटपणे पाहत बसले होते.वाढती गुन्हेगारी व आर्थिक गैरव्यवहार,अशा दोन कारणांमुळे बीड जिल्हा बदनाम झाला आहे.आमच्यासमोर जगावं की मरावं,असा प्रश्न उभा ठाकला आहे,सरकारने आमचे पाकव्याप्त काश्मीर मध्ये स्थलांतर करावे,अशी मागणी धस यांनी केली व उभे सभागृह अवाक झाले.
सरपंच संतोष देशमुख यांची पंधरा दिवसापूर्वी निर्घृणपणे हत्या करण्यात आली.या प्रकरणातील आठ आरोपीना अटक झाली,पण या कटामागे असलेला मुख्य सूत्रधार आजही मोकाट फिरत आहे.त्या मास्टरमाइंडची बीड जिल्ह्यात इतकी दहशत आहे की पोलीसही त्याला हात लावू शकत नाहीत.त्यामुळे हे प्रकरण केंद्रीय गृहमंत्रालयाकडे नेण्यात आले.दरम्यान शरद पवार यांनी काल सकाळी बीड येथे जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.या भेटीत संतोष देशमुख यांच्या कन्येने जो हंबरडा फोडला,तो पाहून पवार देखील गहिवरले.संतोष देशमुख यांची हत्या ज्याप्रकारे करण्यात आली ती पाहता असा अमानुष प्रकार आजवर कधी झाला नसावा,इतक्या क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली.त्या मास्टरमाइंडला मुंडे यांचे वारसदार संरक्षण देत असतील,आणि त्यांना मंत्रिमंडळात उजळपणे बसता येत असेल,तर ते उभ्या महाराष्ट्राचे दुदैव आहे,असेच म्हणावे लागेल.त्यांचे वारसदार कृषीमंत्री असताना पीकविमा योजनेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी हेच दोषी असल्याचा थेट आरोप धस यांनी केला.या सर्व घडामोडींनंतर पवार यांच्या बीड दौऱ्यानंतर फडणवीस सरकार जागे झाले व मुख्यमंत्री फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना सोडणार नाही,मग तो कोणत्या पक्षाशी किंवा नेत्यांशी संबधित असला तरी कठोर कारवाई होणारच,असे जाहीर केले.संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस तब्बल त्यांच्या तेराव्या दिवशी ही घोषणा करतात,त्यांचे तोंड इतके दिवस कोणी बांधून ठेवले होते.न्यायालयीन व एसआयटी स्तरावर तपास करण्यात येईल,असे ते
जाहीर करतात,याला काय म्हणावे ?
वास्तविक फडणवीस यांनी देशमुख यांची हत्या झाल्यानंतर लगबगीने दखल घेण्याची गरज होती.त्यांनी ताबडतोब न्यायालयीन चौकशी व एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला असता तर सरकारची लक्तरे वेशीला टांगली गेली नसती.पण या प्रकरणात आपले सहकारी अडकले जातील,याची त्यांना कल्पना होती,त्यामुळे त्यांनी सतत चालढकल केली.पवार यांच्या बीडला जाण्याने ते जागे झाले व त्यांनी याविषयी सभागृहात निवेदन केले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी तातडीने पाठवले.त्यांची ही कृती न्यायाला धरून नाही.संतोष देशमुख यांची पत्नी व कन्येचा आक्रोश,हा त्यांच्या ” लाडक्या बहीण योजने, ” ला छेद देऊन गेला,असच म्हणावं लागेल.

