जव्हार प्रतिनिधी,
बालविवाह रोखण्यासाठी कासटवाडी ग्रामपंचायतीतर्फे ठराव मंजूर,
ग्रामीण भागात बालविवाह आणि कमी वयात लग्न होण्याच्या घटनांमुळे वाढणाऱ्या कुपोषणाची समस्या सतत वाढत आहे. तसेच माता-बाळ मृत्यूचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी कासटवाडी ग्रामपंचायतीने एक महत्त्वाचा ठराव केला आहे.
- या ठरावानुसार, ग्रामपंचायत क्षेत्रात कमी वयात साखरपुडा आणि लग्न करण्यास बंदी करण्यात आली आहे.याविषयीचा ठराव विशेष ग्रामसभेत मांडण्यात आला, ज्यामध्ये कासटवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच कल्पेश विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली.सरपंच कल्पेश राऊत यावेळी म्हणाले, ” बालविवाहामुळे मुलांचे जीवनमान,आरोग्य आणि शिक्षणावर गंभीर परिणाम होतो.कमी वयातील मातांच्या गरोदरपणामुळे कुपोषण व आरोग्याच्या समस्या उद्भवतात.ज्यामुळे अनेकदा माता व बाळाचा मृत्यू होण्याचा धोका निर्माण होतो. हे रोखण्यासाठी कमी वयात साखरपाडा व लग्नांवर बंदी घालण्याचा ठराव हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.”
ग्रामपंचायत अधिकारी किशोर सोनवणे यांनी या मोहिमेसाठी सरकारच्या पातळीवरील विशेष उपाययोजनांची माहिती दिली आणि या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आशा सेविका,अंगणवाडी कार्यकर्त्या आणि ग्रामस्थांच्या सहकार्याचे महत्त्व स्पष्ट केले.
यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये उपसरपंच त्रिंबक रावते,ग्रामपंचायत सदस्य कुणाल रावते,नितीन चौधरी,नितीन टोकरे,शंकर इल्हात,अशोक इंधन, कल्याणी राऊत,सुलोचना चौधरी,सुचिता होळकर, राजश्री टोकरे यांचा समावेश होता.तसेच तलाठी,कृषी सहाय्यक आणि ग्रामस्थांनीही या निर्णयाचे स्वागत केले.
ग्रामपंचायत कासटवाडीने सर्व ग्रामस्थांना बालविवाह रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. बालविवाहाच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू करण्यात येणार आहेत.

