दीपक मोहिते,
पर्यावरणाची ऐसी तैसी,
मुंबई कोस्टल रोडसाठी ९ हजार खारफुटींची कत्तल होणार,
वर्सोवा ते भाईंदरपर्यंत कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या उद्देशाने मुंबईच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरु होणार आहे.त्यासाठी सुमारे ९ हजार खारफुटीची कत्तल करण्यात येणार आहे.एवढ्या मोठ्याप्रमाणात कत्तल होणार असल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे.सदर बाब चिंता निर्माण करणारी आहे.पण महायुती सरकार विकासाच्या नावाखाली सुरु असलेला धुमाकूळ थांबवायला तयार नाही.
राज्यशासनाच्या अधिकृत दस्ताऐवजानुसार,या प्रकल्पामुळे सुमारे ९ हजार खारफुटीची झाडे तोडण्यात येणार आहेत व अतिरिक्त ५१ हजार झाडे प्रभावित होणार आहेत.मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीमुळे शहराच्या शाश्वत शहरी नियोजन व पर्यावरण,या दोन संवेदनशील विषयावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( एम.एम.आर.डी.ए ) आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (बी.एम.सी.) यांनी या प्रकल्पाची रूपरेषा २० हजार कोटी रु.च्या उपक्रमाच्या रूपात मांडली आहे.ज्यामध्ये भूमिगत बोगदे,केबल-स्टेड पूल आणि वाहनांसाठी इंटरचेंज असलेले २५ कि.मी.चा हाय-स्पीड कॉरिडॉर तयार करण्यासाठी डिझाइन केले आहे.पायाभूत सुविधांचे आश्वासन देण्यात आले आहे. पण किनारपट्टीच्या संरक्षणात खारफुटीची भूमिका फार मोठी आहे.त्यांच्या दाट झाडीमुळे भरती-ओहोटी, वादळ लाटा आणि किनारपट्टीच्या धूपापासून नैसर्गिक अडथळे म्हणून काम करतात.ज्यामुळे मुंबईच्या असुरक्षित किनाऱ्याचे रक्षण होते.पर्यावरण संरक्षणाव्यतिरिक्त ते जैवविविधतेचेही संरक्षण करतात.असंख्य सागरी प्रजातींना जीवदान देत असतात.या झाडांच्या नुकसानीचा मुंबईच्या पर्यावरण संतुलनावर मोठा परिणाम होऊ शकतो. अधिकृत नोंदींवरून असे दिसून येते की कोस्टल रोडचा संरेखन शहराच्या पश्चिम किनारपट्टीवरील महत्त्वाच्या खारफुटीच्या भागातून जाणार आहे.प्रकल्पाच्या ई आणि एफ पॅकेजेसवर सर्वाधिक परिणाम होईल,जेथे सध्या दाट खारफुटीची जंगले आहेत. गेल्या वर्षी नोव्हें.मध्ये पर्यावरण,वन आणि हवामान बदल मंत्रालयाने दिलेल्या पर्यावरणीय मंजुरीमुळे स्थानिक हिरव्यागार आच्छादनावर व्यापक परिणाम होणार आहे.
“या प्रकल्पाचे उद्दिष्ट वाहतूक कोंडी कमी करणे आणि शहरी गतिशीलता सुधारणे,हे असले तरी,यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय खर्च होणार आहे,” अशी एका आघाडीच्या पर्यावरणीय थिंक टँकमधील पर्यावरण तज्ज्ञाने टिप्पणी केली.” ९ हजार खारफुटीच्या झाडांचे नुकसान,हे केवळ संख्येबाबत नाही तर ते हवामानाशी संबंधित धोक्यांपासून मुंबईचे संरक्षण करणाऱ्या नैसर्गिक अडथळ्यांच्या नुकसानीबद्दल आहे.” खारफुटीच्या इतक्या मोठ्या क्षेत्राला साफ करण्याच्या निर्णयामुळे आता सार्वजनिक चर्चा सुरू झाली आहे.पर्यावरण कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवाशांनी दीर्घकालीन परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सरकारच विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचे संतुलन विस्कळीत करू पाहत आहे.त्याचे दूरगामी परिणाम जाणवणार आहेत.

