दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
महायुती व माहाविकास आघाडीमध्ये सारं काही आलबेल नाही,
निवडणुकीचा निकाल लागून २१ दिवस उलटून गेले तरी राज्यात अद्याप मंत्रिमंडळ अस्तित्वात आलेले नाही.कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदे व कोणती खाती कोणाला द्यायची,यावर एकमत होत नसल्यामुळे मंत्री परिषद स्थापन करण्याची प्रक्रिया सतत लांबणीवर पडत आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडी देखील तुटण्याच्या मार्गावर आहे.उद्धव ठाकरे यांची पावले पुन्हा हिंदुत्वाच्या दिशेने पडू लागल्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आता वेगळ्या चुली मांडण्याच्या तयारीला लागले आहेत.उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले आ.मिलिंद नार्वेकर यांनी केलेल्या एका ट्विटनंतर सेनेचा छुपा अजेंडा बाहेर आला आहे.भविष्यात महायुतीकडून होणारे कडव्या हिंदुत्वाच्या राजकारणाचा अंदाज आल्यानंतर उद्धव ठाकरे आता ” यु टर्न,” करण्याच्या तयारीला लागले आहेत.काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष राजकारणाचा अजेंडा महाराष्ट्राच्या जनतेच्या पचनी पडत नाही,हे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत दिसून आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा हिंदुत्वाकडे वळण्याचे ठरवले आहे.त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांनी ” बाबरी मशीद पडल्याप्रकरणी आम्हाला अभिमान आहे,” अशा आशयाचे ट्विट केले.वास्तविक नार्वेकर यांची ही कृती उद्धव ठाकरे यांच्या संमतीशिवाय झाली असेल,यावर कोणही विश्वास ठेवणार नाही.विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मतामध्ये ७ % ने घसरण झाली.ही मते भाजपकडे न जाता शिंदे यांच्या शिवसेनेकडे वळली.ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन उद्धव ठाकरे हे आता वेगळी भूमिका घेतील,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अभिनंदनासाठी कॉल जाणे,हा त्याचाच एक भाग असू शकतो.निकालानंतर फडणवीस यांनी राज यांच्या मनसेविषयी ” ते आमच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीचे आहेत,” असे वक्तव्य केले होते.मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या वक्तव्याला अनन्यसाधारण महत्व आहे.हे महत्व उद्धव ठाकरे यांनी ओळखले व नार्वेकर यांचे ट्विट वायरल झाले.मात्र गृहमंत्री अमित शहा त्यांना थारा देतील,असे वाटत नाही.कारण उद्धव ठाकरे हे गेली पाच वर्षे अमित शहा यांच्यावर सातत्याने तोंडसुख घेत होते.दुसरीकडे महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सतत गळचेपी होत असल्यामुळे अजित पवार हे सध्या विमनस्क स्थितीत असल्याचे पाहायला मिळत आहे.काल शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत त्यांनी पवार यांची भेट घेतली.या दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली.या सर्व घडामोडी महायुती व महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत देणारे आहेत.

