दीपक मोहिते,
बॉटमलाईन,
अखेर अमेरीका गुडघ्यावर आली, ट्रम्पवर अमेरिकन जनतेचा वाढता दबाव,
अमेरिका – इराण या दोन देशा दरम्यान सुरु असलेल्या युद्धात तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, हे युद्ध लवकरात लवकर थांबले पाहिजे, अशा निष्कर्षाप्रत आले आहेत. त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेत सौम्यपणा आता सौम्यपणा आला आहे. त्यांच्यामध्ये अचानक असा आश्चर्यकारक बदल कसा झाला? यावर एक नजर टाकुया…
अगदी दोन दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे तेलनिर्मिती प्रकल्प उध्वस्त करू धमकी देण्यास सुरुवात केली होती. मात्र इराणने त्यांच्या धमक्याना धूप न घालता हॉर्मुझ सामुद्रधु
नी कायमची बंद करू तसेच ज्या आखाती देशात अमेरिकेचे लष्करीतळ आहेत, ते आम्ही बेचीराख करू, अशी धमकी देत पलटवार केला होता. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प गुडघ्यावर आले. जे ट्रम्प ४८ तासात होर्मुज उघडलं नाही, तर इराणचे ऊर्जा प्रकल्प बरबाद करुन टाकू, अशा सिंहगर्जना करत होते,त्याच डोनाल्ड ट्रम्प यांनी काल अचानक यू-टर्न घेतला. ते म्हणाले की, “ इराणसोबत शांततेसाठी आमच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. माझी स्वत:ची इराणच्या नेत्यांसोबत फोनवर चर्चा झाली आहे,” युद्ध कधीपर्यंत थांबणार ? याविषयी मात्र ट्रम्प यांनी स्पष्ट केले नसले तरी त्यांनी पुढचे पाच दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करणार नाही, असे जाहीर केले आहे. इराणने मात्र ट्रम्प यांचे हे दावे फेटाळून लावले आहेत,अशी कुठलीही चर्चा सुरु नसल्याचं इराणचं म्हणणं आहे. इराणी मिडियाने तर ट्रम्प यांची चांगलीच खिल्ली उडवली आहे. याबाबत कसलीही चर्चा सुरु नसल्याचं इराणी मीडियाने म्हटलं आहे. इराणशी युद्ध सुरु झाल्यानंतर स्वत: ट्रम्प यांनी अनेकदा कोलांट्या उड्या मारल्यामुळे, खर काय, अन खोटं काय असा प्रश्न लोकांच्या मनात उभा ठाकला आहे.मात्र या सर्व घडामोडीमुळे अमेरिका अडचणीत आल्याचे स्पष्ट झाले आहे.
ट्रम्प आज अचानक असं का बोलत आहेत ? असा प्रश्न साहजिकच मनात निर्माण होतो. चर्चा सुरु जरी असली, तरी त्यांनी ती सार्वजनिक का केली ? या संवेदनशील विषयी इतकी घाई का केली ? जेव्हा दोन देशांमध्ये युद्ध सुरु असतं, तेव्हा पडद्यामागे चर्चा सुरु असते. पण जोपर्यंत कुठलीही घोषणा होत नाही, तोपर्यंत युद्धातील देश,असा खुलासा करत नाहीत. युक्रेन युद्धात अमेरिका आणि युरोप यांच्यामध्ये युद्ध रोखण्यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, पण युद्ध सुरु असताना चर्चेची कुठलीही माहिती देण्यात आली नाही.
इराणशी अमेरिका आणि इस्रायल, हे दोन देश संयुक्तपणे लढत आहेत. अमेरिका म्हणतेय की इराण सोबत आमची चर्चा सुरु आहे. तर इराण त्याचा इन्कार करत आहे. इस्रायलही याविषयी काहीही बोलत नाही. इराणने या युद्धात आपले सुप्रीम लीडर तसच अनेक मोठ्या अधिकाऱ्यांना गमावलं आहे. त्यामुळे इराण युद्ध थांबवायला तयार नाही. अशावेळी तो शांततेसाठी अमेरिकेशी बोलणी करण्यास तयार होईल, असे वाटत नाही.अशा बोलणीमध्ये आपल्या देशाच्या हिताचे काही नाही, हे तो जाणून आहे.ट्रम्प हे भविष्यात होणारी तेलटंचाई व इंधनाचे दर स्थिर ठेवण्यासाठी असे दावे करत असावेत.इस्त्रायलच्या नादी लागून देशावर लादलेल्या या युद्धामुळे ट्रम्प यांच्यावर अमेरिकन जनता नाराज असून त्यांच्यावर सतत दबाव वाढत आहे. दुसऱ्या देशासाठी आपल्या देशाला युद्धाच्या खाईत ढकलणे, हे अमेरिकन जनतेला मान्य नाही. या युद्धात होत असलेला अवाढव्य खर्च हे सुद्धा ट्रम्प यांच्या यू-टर्न मागे एक कारण असू शकतं.
२८ फेब्रु. रोजी इराणवर हल्ला करण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या युद्धनौका इराण जवळच्या समुद्रात तैनात केल्या होत्या . दुसरीकडे शांततेसाठी त्यांची चर्चा चालली आहे. या चर्चेतून काहीतरी चांगल निष्पन्न होईल,अशी शक्यता वाटत असताना अमेरिका-इस्रायलच्या फायटर जेट्सनी अचानक इराणवर हल्ला चढवला. आता ताज्या माहितीनुसार, युसएसएस बॉक्सर, युएसएस पोर्टलँड, युएसएस कॉमस्टॉक, युएसएस न्यू ऑर्लियंस आणि युएसएस त्रिपोली या युद्धनौका इराणच्या दिशेने जात आहेत. या काही सामान्य युद्धनौका नाहीत. या युद्धनौकांवर स्पेशल मरीन कमांडोज तैनात आहेत. जे कुठलही कठीण समुद्री मोहीम राबवण्यासाठी सक्षम आहे. इराणच्या ताब्यातील बेटं किंवा स्ट्रेट ऑफ हॉर्मुज सुरक्षित करण्यासाठी हे मरीन कमांडोज स्पेशल ऑपरेशन्स करु शकतात. ते या भागात येईपर्यंत अमेरिकेच्या नौदलाला इराणकडून कुठलाही धोका निर्माण होऊ नये, हा देखील अमेरिकन रणनितीचा एक भाग असू शकतो.

