दीपक मोहिते,
पुरोगामी राज्य अशी ओळख असलेले राज्य आता वेगळ्या वळणावर,
पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा आता पूर्णतः काळवंडला असून दररोज काहींना काही राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांचा अपघाती मृत्यू, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील जीवघेणे राजकारण,भोंदूबाबा अशोक खरात याच्या उलाढाली, व त्याच्या नादी लागणारे मंत्री, महिला आयोगाच्या अध्यक्षाचा तडकाफडकी राजीनामा, त्यांच्या तीन मंत्र्यांची प्रकरणे, यामुळे फडणवीस यांच्या सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत.
राज्याच्या राजकारणाचे किती अध:पतन होत आहे, हे आपल्याला पावलोपावली जाणवू लागले आहे. या सरकारच्या राज्यात भ्रष्टाचार इतका बोकाळला आहे की, ज्या मतदारांनी आपले विश्वस्त म्हणून ज्यांना निवडून दिले. तीच मंडळी सध्या लुटारू तसेच गुंडाच्या भूमिकेत वावरू लागले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या नावाला काळिमा लागला आहे. ज्या महाराष्ट्राने यशवंतराव चव्हाण,शंकरराव चव्हाण,वसंतराव नाईक,वसंतदादा पाटील,अशी नररत्ने दिली. त्याच राज्यात सध्या जे काही चालले आहे, ते पाहता आपण कुठे निघालो आहोत ? असा प्रश्न साहजिकच मनात उभा राहतो. फडणवीस यांच्या राज्यात अशा घटनांना राजमान्यता मिळत असल्यामुळे या अशा अपप्रवृत्ती फोफावत चालल्या आहेत. या सर्व घडामोडी लक्षात घेता,राज्याचे राजकारण व समाजकारणाची गाडी आता रुळावरून घसरत चालली आहे. ती पुन्हा रुळावरून सुरळीतपणे धावू लागेल,असे वाटत नाही. सरकारने काही वर्षांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा केला खरा, पण अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या मंत्र्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभवती मुक्त वावर असल्याचे पाहायला मिळत आहे.
आज आपला महाराष्ट्र एका विशिष्ठ वळणावर येऊन ठेपला आहे, अशीच स्थिती राहिल्यास येणाऱ्या दिवसात या राज्यातील जनतेला अनेक अनिष्ठ गोष्टीना सामोरे जावे लागणार आहे, तशी वेळ येऊ नये, एवढीच या राज्यातील जनतेची इच्छा आहे.

