दीपक मोहिते,
” ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?”
खूप दिवसानंतर आज पुन्हा मी एका राजकीय उलथापालथीवर लेख लिहीत आहेत. मी अनेकदा लिहीत आलो की राजकारणात कधीही काहीही घडू शकते. कारण, राजकारणात कोणीच कोणाचे नसते.आज राज्यस्तरावर जे काही घडत आहे,तसाच काहीसा प्रकार ठाणे जिल्हा मध्य.सह.बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीतही आपल्याला पाहायला मिळत आहे. आजच्या घडीला राजकारणात ” स्वार्थ,” हा नातेसंबंधाच्या सतत आड येऊ लागला आहे. त्याचा अनुभव वसई – विरार भागात पावलोपावली अनुभवायला मिळत आहे.
काल या निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या सभेत पक्षाचे सर्वेसर्वा माजी आ.हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या भाषणात तीव्र संताप व्यक्त केला.या संतापाचे कारण होते,त्यांचा भाचा,पक्षाचा माजी नगरसेवक हार्दिक राऊत याचे भाजपच्या पॅनलमधून बँकेची निवडणूक लढवणे होय..
नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत राऊत यांना ठाकूर यांनी पुन्हा संधी दिली होती. पण त्या निवडणुकीत हार्दिक राऊत यांच्यासह पॅनलमधील सर्वांना पराभव चाखावा लागला. पराभूत झालेल्या राजकारणी मंडळीना पदाशिवाय रात्रीची झोप लागत नाही. पराभव झालेल्या दिवसापासून ते सत्तेत म्हणा किंवा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्याचा प्रयत्न करत असतात. ही मंडळी पदाशिवाय जगू शकत नाही. ” ईर्षा व स्वार्थ,” अशा दोन गोष्टींच्या ते पूर्णपणे आहारी जातात. त्यामुळे ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या राजकीय अस्तित्वाची चाचपणी करु लागतात व वेळप्रसंगी पक्ष बदलतात. हार्दिक राऊत यांच्या बाबतीत असेच घडले. बँकेची उमेदवारी मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी भाजपच्या परिवर्तन पॅनेलची वाट पकडली व त्यांनी उमेदवारी मिळवली व प्रचारास सुरुवात केली. पण प्रचारात बविआतील आपल्या जुन्या सहकाऱ्यांना कॉल करून एक मत देण्याची विनंती केली. त्यामुळे आ.हितेंद्र ठाकूर यांचा संताप अनावर झाला व त्यांनी आपल्या भाषणात ” जे गेले,ते माझ्यासाठी मेले,” असे म्हंटले. हे घडणं अगदी साहजिकच होते, कारण,खूप काही दिल्यानंतरही असा प्रकार आपल्या घरातूनच होत असेल तर ते पुढील राजकीय वाटचालीत त्रासदायकच आहे. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात तसेच कार्यकर्त्यांमध्ये वेगळा संदेश जाईल व त्याचे पडसाद उमटू शकतात,या विचारातून माजी आ.ठाकूर यांच्या संतापाचा कडेलोट झाला.आता प्रश्न उरतो की ” ठाकुरको आखीर गुस्सा क्यो आता आहे,” याचे उत्तर काय आहे ते पाहूया,
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ठाकूर यांनी पुन्हा स्वतःला चांगलेच सक्रिय केले. महानगरपालिका निवडणुकीत भाजपने त्यांच्यासमोर उभे केलेल्या आव्हानामुळे, त्यांना विवा कॉलेजमधून बाहेर पडणे भाग पडले. त्याच सुमारास पक्षालाही चांगलीच गळती लागली होती.दररोज कोण ना कोण तरी भाजपच्या तंबूत दाखल होत होते.अशा परिस्थितीत ठाकूर यांनी एकहाती खिंड लढवली व कशीबशी महानगरपालिका जिंकली.पण पडझड मात्र खूप झाली. पक्षाची १०८ जागांवरून ७१ वर घसरण झाली तर भाजपने १ जागेवरून ४४ वर मजल मारली.या विजयाचे सारे श्रेय केवळ ठाकुरांचे होते. विरोधक देखील ही बाब खाजगीत मान्य करत असतात. मात्र या साऱ्या धामधुमीत ठाकूर यांना गेल्या दोन वर्षात जो सेटबॅक बसला, त्यामागे अनेक कारणे आहेत.ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय गृहकलह चव्हाट्यावर येणे, पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांचा फाजील आत्मविश्वास व पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आलेला मरगळपणा,या तीन प्रमुख कारणांचा त्यामध्ये समावेश होता.आता बँकेच्या निवडणुकीतही गृहकलह चर्चेत आला आहे, पण त्याचा फारसा परिणाम होईल,असे वाटत नाही. मात्र या प्रकरणी ठाकुरांचा संयम सुटायला नको होता, हल्ली आयाराम गयारामाचा जमाना आहे.त्यामुळे भविष्यातही या अशा घटना घडणारच, कारण आता निष्ठेला काडीची किंमत उरलेली नाही.ठाकुरांचा हा ” गुस्सा,” हा मानवी जीवनाचा आविष्कार आहे, तो अगदी सहजपणे व्यक्त होत असतो.

