दीपक मोहिते,
फ्रंटलाईन,
यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
जून महिना संपत आला तरी अद्याप मान्सूनचा पत्ता नाही. त्यामुळे राज्याच्या शहरी व ग्रामीण भागात सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्याची जी काही चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे, ती अल निनोच्या प्रभावामुळे असे हवामान तज्ञाचे म्हणणे आहे. राज्यात केवळ २३ % टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी हा आकडा ३२ % इतका होता. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यावर फार मोठे संकट येणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

पाऊस रखडल्यामुळे सरकारकडून पाणीकपातीचे संकेत देण्यात आले आहेत. राज्याच्या अनेक शहरात २० % पाणी कपात करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे सरकारने शहरी भागातील नागरिकांना पाणी जपून वापरा व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये,असे आवाहन केले आहे. त्यामुळे राज्यावर पाणीसंकटाचे सावट आल्याचे स्पष्ट झाले आहे. मान्सून राज्याच्या वेशीवर आल्याचा दावा करण्यात असला तरी त्यामध्ये किती तथ्य आहे, हे सांगता येणार नाही. ही परिस्थिती आगामी काळात राज्यावर दुष्काळाची टांगती तलवार आहे, हे स्पष्ट करणारी आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या गंभीर परिस्थितीवर चर्चा झाली.पाऊस लांबल्यामुळे ग्रामीण भागातील विहिरी,तलाव नदी नाल्यानी तळ गाठला आहे. तर पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊ नये,यासाठी पेरणीच्या कामाना ब्रेक लावला आहे.
गेल्या दहा वर्षात हवामानात झालेले बदल पर्यावरणावर परिणाम करणारे ठरले आहेत. बेभरवसा मान्सून, मधूनच होणारे त्याचे पलायन व अवकाळी पावसाचे वाढते प्रमाण,अशा तीन कारणामुळे ऋतुचक्र पार विस्कळीत झाले आहे. निसर्गाचा लहरीपणा, गारपिटी व अधूनमधून निर्माण होणारी टंचाई, यास मानवाचा नैसर्गिक संसाधने ओरबाडून खाण्याचा हव्यास कारणीभूत ठरला आहे. मात्र मानव आपली चूक सुधारायला तयार नाही.त्याची फळे आता आपल्याला भोगायला लागत आहेत.

