दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
सेनेच्या वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र,”
आज १९ जून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा ६० वा वर्धापनदिन साजरा करण्यात येत आहे.त्याचवेळी त्यांच्या पक्षाचे सहा खासदार शिंदे गटाच्या तंबूत दाखल झाले आहेत. ही घटना उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी ठरली आहे. दुसरीकडे शिवसेनाही ( शिंदे गट ) त्याच दिवशी आपला वर्धापनदिन साजरा करत आहे.निवडणूक आयोगाने तीन वर्षांपूर्वी ( १७ फेब्रु.२०२३ ) रोजी एकनाथ शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता दिली व कालांतराने सेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हही त्यांना बहाल केले.अशा सर्व परिस्थितीमध्ये हे दोन्ही पक्ष आपापले वर्धापनदिन साजरा करत आहेत.या चार वर्षाच्या काळात एकनाथ शिंदे यांनी फोडाफोडीचे राजकारण करत आपला पक्ष राज्यात रुजवला.
६० वर्षाच्या प्रदीर्घ वाटचालीनंतर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे.गेली सहा दशके मराठी माणसाच्या न्यायहक्कांसाठी लढणारा हा पक्ष आज स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात आहे.प्रारंभी मराठी व नंतर हिंदुत्व,असे अजेंडे राबवणाऱ्या शिवसेनेवर एकामागून एक अशी संकटे कोसळत आहेत.हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या साम्राज्याचा पाया खिळखिळा करणाऱ्या संघटनेला आता प्रत्येक आघाडीवर आपल्याच मित्रपक्षाशी झुंज द्यावी लागत आहे. तीस वर्षे भाजपशी सोयरीक केल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी करून सत्ता मिळवावी लागली होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत ४० आमदार व १३ खासदार यांनी त्यांची साथ सोडली व बाळासाहेबांच्या अथक प्रयत्नातून उभी राहिलेली शिवसेना अक्षरशः छिन्नविच्छिन्न झाली. बाळासाहेबांनी पदाला कधीही महत्व दिले नाही,आयुष्यभर त्यांनी रिमोट म्हणून सेनेवर वचक ठेवला.पण उद्धव यांनी मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापायी स्वतःचाच पक्ष संपवला.एकेकाळचे त्यांचे सर्व विश्वासू सहकारी हिंदुत्वाच्या प्रश्नावर बाजूला झाले.
६० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या जहाल संघटनेचे असे तुकडे होतील,असे मराठी माणसाला कधीही वाटले नव्हते.त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज होती, पण ते कायम गुर्मीत राहीले. मराठी माणसाचे न्यायहक्क व हिंदुत्व,हे दोन ज्वलंत विषय घेऊन संघटनेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या बाळासाहेबांनी किती खस्ता खाल्या, किती संकटे झेलली व आज त्यांच्या या लढावू संघटनेची अवस्था कशी झाली आहे, याचा लेखा-जोखा मांडायलाच हवा.सहा दशकापूर्वी
बाळासाहेबांनी मार्मिक साप्ताहिकांमधून त्याकाळात सत्ताधाऱ्याना सळो कि पळो करून सोडले होते. तसेच सभेतील त्यांची जहाल भाषणे लोकांना आवडत असत, त्यांच्या आक्रमकतेमुळे हळूहळू अवतीभवती माणसे जमू लागली. मार्मिक कार्यालयाकडे आपल्या समस्या व अडचणी घेऊन येणाऱ्या नागरिकांची रीघ सुरू झाली होती. त्यापैकी अनेकांनी राजकीय पक्ष स्थापन करा,अशी मागणी करण्यास सुरुवात केली.मराठी माणसाचा आग्रह व प्रबोधनकारांची संमती मिळाल्यानंतर बाळासाहेबांनी पक्ष नको आपण संघटना स्थापन करू, असे स्पष्ट करत पुढील कामाचे नियोजन आखले. नव्याने स्थापन झालेल्या संघटनेला प्रबोधनकारांनी शिवसेना असे नाव दिले. अशाप्रकारे शिवसेनेचा जन्म झाला. त्यावेळी केवळ १८ लोक उपस्थित होते.
त्यानंतर मात्र लोकांची गर्दी वाढत गेली. बाळासाहेबांच्या नांवाची सर्वत्र चर्चा होऊ लागली.त्याकाळी मुंबई बंद करण्याचे धाडस फक्त समाजवादी नेते जॉर्ज फर्नाडिस एकटेच करू शकायचे. याव्यतिरिक्त हे धाडस करू शकणारे एकमेव बाळासाहेबच, मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात बाळासाहेबांनी रणशिंग फुंकले व मराठी माणूस पेटून उठला.१९६८ मध्ये संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली.१९७० मध्ये वामनराव महाडिक यांनी शिवसेनेतर्फे उगवता सूर्य,या चिन्हावर निवडणूक लढवली व ते विजयी देखील झाले. अशाप्रकारे सेनेचा राजकीय प्रवास सुरू झाला. पक्षाला १९८९ साली धनुष्यबाण चिन्ह मिळाले, तत्पूर्वी त्यांना एकूण सहा चिन्हावर निवडणुका लढवायला लागल्या होत्या.१९८४ साली मनोहर जोशी व वामनराव महाडिक या दोघांनी भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवली होती. कप-बशी, ढाल-तलवार, इंजिन व मशाल,असा प्रवास करत, आता पुन्हा त्यांच्या हाती मशाल आली आहे. चिन्हासाठी आवश्यक मतांची टक्केवारी नसल्यामुळे सेनेला सुरुवातीच्या काळात विविध चिन्हे वापरावी लागली.१९६८ ते २०१९ च्या राजकीय प्रवासात शिवसेनेने प्रजासमाजवादी पक्ष (१९६८ ते १९७० ) १९६९ मध्ये इंडिकेट व सिंडिकेट काँग्रेस,१९७२ मध्ये रिपब्लिकन पक्ष ( रा.सु.गवई गट )
१९७२ मध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूरते मुस्लिम लीगशी हातमिळवणी केली. १९७४ मध्ये काँग्रेस,१९७७ मध्ये दलित पँथर,१९७७ ते १९८० मध्ये पुन्हा काँग्रेस,१९८९ ते २०१९ भाजप व २०१९ मध्ये मुख्यमंत्रीपदावरून झालेल्या मतभेदांमुळे भाजपशी काडीमोड झाला व काँग्रेस/राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी केला. ही आघाडीच अथक प्रयत्नातून उभारलेल्या पक्षाच्या विनाशाला कारणीभूत ठरली. त्यांच्या सरकारला अडीच वर्षे पूर्ण होत असताना अचानक आक्रीत घडले व पक्षाची अक्षरशः वाताहत झाली. मराठी माणसाची अस्मिता व हिंदुत्वाचा धगधगता निखारा,असा हा प्रवास,त्यांच्याच एका शिलेदाराने ४० आमदारांना सोबत घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सत्तेतून पायउतार तर व्हायला लावलेच,पण शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह गमावण्याची नामुष्की त्यांच्यावर आणली. आज उद्धव ठाकरे अत्यंत गलितगात्र अवस्थेत पक्षाचा गाडा कसाबसा चालवत आहेत. त्यांचे बंधू राज ठाकरे हे छगन भुजबळ, नारायण राणे व इतर अनेक नेते सेनेपासून दुरावले. दर आठवड्याला कोण ना कोणतरी त्यांची साथ सोडून जात आहे. राजकारणात आपले पाऊल नेमके कुठे चुकले ? याविषयी त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे होते. पण ते न करता त्यांनी केवळ भुई धोपटण्याचे काम केले. त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याला आवर्जून भेटायचे. त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची आस्थेने चौकशी करत असत, ती प्रथा उद्धव ठाकरे यांनी मोडीत काढली. त्यानंतर त्यांनी हिंदुत्वाला तिलांजली देत काँग्रेसशी केलेली सोयरीक कट्टर हिंदुत्ववादी शिवसैनिकांना मान्य झाले नाही व पक्षाचा अक्षरशः पालापाचोळा झाला. अशा परिस्थितीत उद्या पक्षाचा ६० वा वर्धापनदिन साजरा होत आहे.

