दीपक मोहिते,
न्यूजलाईन,
इस्रायलच्या वागण्यामुळे युद्धविराम दृष्टिक्षेपात नाही…
अमेरिका – इराण दरम्यान झालेले युद्ध आता दोन आठवड्यासाठी थांबले असून या दोन्ही देशाचे प्रतिनिधी आज युद्धविरामावर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद शहरात दाखल होत आहेत. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हेन्स, हे आपल्या सहकाऱ्यांसह पाकिस्तानात पोहोचले आहेत, पण इराणच्या प्रतिनिधी मंडळाचे विमान अद्याप तेहरानवरून निघाले नसल्याचे कळते. २ आठवड्याची शस्त्रसंधी झाल्यानंतरही अमेरिकेचा जिगरी दोस्त इस्त्रायलने इराणचा कट्टर समर्थक असलेल्या लॅबेनॉनवर प्रखर बॉम्बहल्ले चढवले. या बॉम्बहल्ल्यात सुमारे अडीचशे ते तीनशे नागरिक मारले गेले. त्यामुळे इराणचा संताप झाला आणि खुली केलेली होर्मुझ सामुद्रधुनी त्यांनी पुन्हा बंद केली. अशा तणावपूर्ण वातावरणात इस्लामाबादमध्ये होत असलेल्या द्विपक्षीय बैठकीत फारसे काही साध्य होईल, असे वाटत नाही.
युद्धविराम लवकरात लवकर व्हावा, यासाठी डोनाल्ड ट्रम्प मात्र गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत, पण इस्त्रायलला ते मान्य नाही, त्यामुळे या बैठकीसंदर्भात पंतप्रधान नेतन्याहू यांनी मौन धारण केले आहे. याउलट ही बैठक होऊ नये,यासाठी त्यांनी लॅबेनॉनवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्यामुळे इराणचा संताप होईल व तो युद्धविराम करण्यास तयार होणार नाही, अशाप्रकारची इस्रायलची रणनिती यामागे आहे आणि घडलंही तसंच, इस्त्रायलच्या अशा डावपेचामुळे इराणने होर्मुझ सामुद्रधुनीचे भूत पुन्हा बाटलीबाहेर काढले व पुन्हा एकदा जगाला चिंतेत टाकले. अमेरिका जोवर इस्त्रायलच्या नाकात वेसण घालत नाही, तोवर होर्मुझ सामुद्रधुनीतुन एकाही तेलवाहू जहाजाला जाऊ देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यामुळे ही बैठक किती फलदायी ठरेल, हे सांगता येणार नाही. या युद्धामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे राजकीय जीवन पणाला लागले आहे. वाढती महागाई, अमेरिकन सैनिकांचे होत असलेले शिरकाण, तेल व गॅसच्या दरात झालेली भरमसाठ वाढ व त्याविरोधात ९० लाख अमेरिकन नागरिकांचे रस्त्यावर उतरून निदर्शने करणे, या सर्व घडामोडीमुळे ट्रम्प यांची लोकप्रियता दिवसेंदिवस घसरत चालली आहे. त्यांना त्यांच्या रिपब्लिकन पक्षातूनही विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच ब्रिटन, फ्रांस, जर्मनी, ऑस्ट्रेलिया व जपान या बलाढ्य राष्ट्राचे वाढते दडपण, अशा कारणामुळे ट्रम्प सध्या धायकुतीला आले आहेत. तसेच इराणला रशिया व चीन या दोन्ही देशाकडून मिळणारी रसद, त्यामुळे हे युद्ध अधिक काळ चालणे अमेरिकेला परवडणारे नाही. पण अमेरिकेचा मित्र असलेला इस्त्रायल मात्र या कामामध्ये खो घालत आहे.त्याला इराण, पॅलेस्टाईन, हमास हजबोल्लाह, लॅबेनॉन यांना कायमचे संपवायचे आहे.

