दीपक मोहिते,
बॉटमलाईन नॅशनल डेस्क
धोकादायक रेल्वेप्रवास ; कायमस्वरूपी तोडगा हवा,
गेल्या काही वर्षात मुंबई ते थेट डहाणू परिसरात नागरीकरणाला प्रचंड वेग आला असून पालघर जिल्ह्याची लोकसंख्या हां हां म्हणता जवळपास ५० लाखाच्या घरात पोहोचली आहे. नागरीकरणाचा हा वेग लक्षात घेऊन राज्य सरकार, जिल्हा प्रशासन,स्थानिक स्वराज्य संस्था व रेल्वे मंत्रालय, यांनी संयुक्तपणे नियोजन करण्याची गरज होती.पण त्यादृष्टीने पावले उचलण्यात आली नाही.त्याचे परिणाम मात्र या परिसरातील जनतेला भोगावे लागले व अद्याप ते भोगत आहेत.
या सर्वांच्या उदासीनतेमुळे जीवघेणा रेल्वे प्रवास,राष्ट्रीय महामार्ग व अंतर्गत रस्त्याची दुरावस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांचा नियोजनशून्य कारभार हा येथील नागरिकांच्या पाचवीला पुजला आहे. पालघर जिल्हा हा मुंबईच्या सीमेला लागून असल्यामुळे या जिल्ह्यातून दररोज तीन ते चार लाख लोक नोकरीनिमित्त रेल्वेने येजा करत असतात.हा प्रवास किती धोकादायक व असुरक्षित आहे, हे प्रवास करणाऱ्यांनाच माहीत आहे. असा हा धोकादायक प्रवास करताना दरवर्षी हजारो प्रवासी मृत्युमुखी पडतात. असे हे गेली अनेक वर्षे सुरूच आहे. पण,हा प्रश्न दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत असल्याचे पाहून दहा वर्षांपूर्वी सरकारने रेल्वेमार्गाचे चौपदरीकरण व सहापदरीकरण करण्याची कामे हाती घेतली.मात्र ते रेंगाळत गेल्यामुळे परिस्थितीमध्ये फारसा बदल होऊ शकला नाही.आजच्या घडीला नालासोपारा,वसई,
मिरारोड व भाईंदर या भागातील प्रवाशांना लोकलच्या डब्यात प्रवेश करता येत नाही. लटकत प्रवास करणारे दरवर्षी शेकडो प्रवासी मृत्युमुखी पडत असतात.अपघाताची आकडेवारी बघितल्यास मानवी जीवन इतके स्वस्त झाले आहे का ? असा प्रश्न मनात उभा राहतो. या दहा वर्षाच्या काळात ज्या काही सोयी – सुविधा रेल्वे प्रशासनाने उपलब्ध केल्या,त्या वाढत्या गर्दीच्या तुलनेत अत्यंत तकलादू स्वरूपाच्या ठरल्या.केवळ लोकलच्या फेऱ्या वाढवून किंवा डबे वाढवून प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येईल,अशा भ्रमात जर रेल्वेचे अधिकारी असतील, तर ते मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत,असेच म्हणावे लागेल.रेल्वेप्रवासाचा प्रश्न अक्राळविक्राळ रूप धारण करण्यापूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मुंबई,ठाणे व पालघर या तीन जिल्ह्यासाठी नियोजनबद्ध विकास आराखडा तयार करावा.तसेच या महत्वाच्या कामात जिल्हा, महानगरपालिका व मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण या यंत्रणांना सहभागी करून घेण्याची गरज आहे. नागरिकांचा सध्या होत असलेला प्रवास हा जीवघेणा तर आहेच,पण अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या प्रवाशांची कुटुंबे देखील देशोधडीला लावणारे आहे. रेल्वेने १५ डब्यांच्या लोकलच्या फेऱ्या आता वाढवल्या आहेत.त्याचा थोडाफार फायदा होईल,पण या ज्वलंत प्रश्नावर आता कायमस्वरूपी तोडगा त्यांनी काढायला हवा.

