दीपक मोहिते,
बॉटम लाईन, नॅशनल डेस्क
युद्धविराम ; जगाचा जीव भांड्यात पडला…
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अखेर काल रात्री थांबलं व जगाने या निर्णयामुळे मनापासून आनंद व्यक्त केला आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशानी सामंजस्याची भूमिका स्विकारत युद्धाविराम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या ४० दिवसापासून सुरु असलेला संघर्ष अखेर काल रात्री थांबला. दोन्ही देशांमध्ये आता शस्त्रसंधी झाली आहे. दोन्ही देशांनी सैन्य कारवाया दोन आठवड्यांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री, सय्यद अब्बास अराघची, यांनी देखील एक्सवर ट्विट करुन सकारात्मक प्रतिसाद दिला दिला आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या वतीने निवेदन जारी करत परराष्ट्रमंत्री अराघची यांनी दोन आठवड्यांसाठी युद्धविराम करण्यात आल्याचे जाहीर केले आहे.
इराणने ज्या ०९ अटी व शर्ती मांडल्या आहेत, त्या मान्य करण्यासारख्या असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तर होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची अट अमेरिकेने घातली होती. त्या अटीला इराणनेदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. इराण, आता हॉर्मुझ पूर्णपणे आणि तातडीने खुला करायला तयार झाला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबवण्यात चीन आणि पाकिस्तानने देखील मध्यस्थी केली व ती उभय देशांनी मान्य केली. सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी झाली असून १० एप्रिल रोजी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात चर्चा सुरु होणार आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे ट्विटमध्ये म्हणाले की, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, ” इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण,”आणि ” युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका,” तसेच त्यांचे सहयोगी देश यांनी लेबनॉनसह इतर सर्वत्र तातडीने युद्धविराम करण्याबाबत सहमती दाखवली आहे, त्यामुळे युद्धविराम त्वरित अंमलात येईल. मी या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो आणि दोन्ही राष्ट्रांच्या नेतृत्वाप्रती माझी कृतज्ञता व्यक्त करतो. तसेच, सर्व वाद मिटवून एका कायमस्वरूपी करारापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने पुढील चर्चा करण्यासाठी, मी दोन्ही देशाच्या शिष्टमंडळांना शुक्र. १० एप्रिल २०२६ रोजी इस्लामाबादला भेट देण्याचे निमंत्रण देत आहे.
ट्रम्प यांनीही सोशल मीडियावर, अमेरिका दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी इराणवरील बॉम्बहल्ले थांबवण्यास तयार आहे. हा द्विपक्षीय युद्धविराम असेल. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्याशी झालेल्या माझ्या चर्चेनुसार आणि त्यांच्या विनंतीनुसार, मी आज रात्री इराणकडे पाठवण्यात येणारी विनाशकारी लष्करी शक्ती थांबवत आहे, परंतु आमची प्रमुख अट अशी आहे की इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे, तात्काळ आणि सुरक्षितपणे उघडण्यास सहमती दाखवावी. हे करण्यामागचे कारण असे आहे की, आम्ही सर्व लष्करी उद्दिष्टे आधीच पूर्ण केली आहेत आणि त्याहूनही पुढे गेलो आहोत आणि आम्ही इराण आणि मध्य-पूर्वेतील शांततेसाठी एका ठोस कराराच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत. मला इराणकडून ९ कलमी प्रस्ताव मिळाला आहे, आणि आमचा विश्वास आहे की या वाटाघाटी दोन्ही देशासाठी फलदायी ठरतील.
मात्र ४० दिवसात इराण – अमेरिका व इस्त्रायलसह अनेक आखाती देशांना या युद्धात जबर किंमत मोजावी लागली. तसेच या युद्धाचे जगाच्या अर्थव्यवस्थेवर चांगलाच परिणाम जाणवला. महागाईने कळस गाठला, तेलाचे भाव अस्मानाला भिडले, हॉर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी तेलाची वाहतूक ठप्प झाल्यामुळे अनेक देशाचे आर्थिक गणित कोलमडून पडले. या युद्धात नाटो देशांनी अमेरिकेच्या पाठीशी उभे राहण्यास नकार दिल्यामुळे ट्रम्प यांची चांगलीच कोंडी झाली. तर दुसरीकडे चीन व रशिया या देशांनी इराणला सर्वोतोपरी मदत केली. त्यामुळे इराणने अमेरिका व इस्त्रायल या दोघांना जेरीस आणण्यात यश मिळवले.

