दीपक मोहिते,
विनोद तावडे यांचे वागणे,” सौ चुहे खाकर,बिल्ली चली हजको,” अशीच…
काल झालेल्या घटनेच्या वेळी आ.हितेंद्र ठाकूर यांनी माणुसकी व संयम दाखवला नसतात,तर नको ती घटना घडली असती.भाजपचा नेता आपल्या मुलाविरोधात कटकारस्थान करतोय,हे माहित असूनही आ.ठाकूर यांनी संयम राखत त्यांना आपल्या कारमध्ये बसवून सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडले.आ.ठाकूर यांनी माणुसकी व संयम दाखवला नसता तर भाजपच्या त्या नेत्याला बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलच्या बाहेर पडू दिले नसते.आ.ठाकूर हे आपल्या मैत्रीला जागले,पण विनोद तावडे यांनी मुंबई येथे पोहोचल्यानंतर ” सरडा जसा रंग बदलतो,” तसा आपला रंग बदलला.
मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी आ.ठाकूर धादांत खोटे बोलत आहेत,असा आरोप केला व हॉटेलमधील सीसीटीव्हीचे फुटेज तपासा,असे आव्हान दिले.चोर स्वतःहून कधी आपण चोरी केल्याचे कबूल करतो का ? हॉटेलमध्ये सीसीटीव्ही बंद करून अंधाऱ्या खोलीत करत असलेली कृष्णकृत्ये कशी कॅमेऱ्यात बंद होऊ शकतात ? आणि हे तावडे महाशय,आता पुरावे मागत सुटले आहेत.घटना घडली तेंव्हा,या नेत्याची पॅन्ट पिवळी होण्याचे शिल्लक होते,आणि आता ते पुरावे द्या,असे बेंबीच्या देठापासून कोकलत फिरू लागले आहेत.याला म्हणतात, ” सौ चुहे खाकर,बिल्ली चली हजको,”
आ.हितेंद्र ठाकूर यांनी मैत्रीला बाधा येणार नाही,याची काळजी घेत माणुसकीचे दर्शन घडवले.पण तावडे महाशयांनी मात्र मित्राच्या पाठीत खंजीर खुपसण्यात धन्यता मानली.ज्या आ.हितेंद्र ठाकूर यांनी वेळो वेळी भाजपला मदत केली,दीड वर्षापूर्वी झालेल्या राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी आपली तीन मते त्यांच्या पारड्यात टाकली व त्याचे सर्व उमेदवार निवडून आले.त्या आ.ठाकूर यांच्याविरोधात त्यांनी कटकारस्थाने करावीत,यासारखे दुसरे पाप नाही.विनोद तावडे यांनी खरं तर आ.हितेंद्र ठाकूर यांचे आभार मानायला हवे होते.ते जर घटनास्थळी आले नसते तर काय झाले असते ? पोलीस देखील त्यांना हॉटेलच्या बाहेर सुरक्षितपणे काढू शकले नसते.आ.ठाकूर यांनी प्रक्षुब्ध झालेल्या आपले चिरंजीव आ.क्षितिज ठाकूर यांचीही यावेळी समजूत काढली.त्यामुळे विनोद तावडे सुरक्षितपणे मुंबईला जाऊ शकले.म्हणूनच आ.हितेंद्र ठाकूर यांची ओळख ” एक अजातशत्रू लोकप्रतिनिधी,” अशी आहे.

