दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
भाजपची निती ; ” मी नाही त्यातली,कडी लावा आतली,”
काल विरार येथे जे काही घडलं,त्याचे कदापी समर्थन होऊ शकणार नाही.लाखो रु.चे वाटप व लाभार्थ्यांच्या नावे असलेली डायरी ताब्यात घेतल्यानंतरही भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस,सुधीर मुनगंटीवार व वाचाळवीर प्रवक्ते प्रवीण दरेकर निर्लज्जपणे त्याचा इंकार करत सुटले आहेत.” खोटे बोल,पण रेटून बोल,” याचा आधार घेत ही नतद्रष्ट मंडळी आता माध्यमांसमोर थयथयाट करत आहेत.घटना घडली तेंव्हा विनोद तावडे हे प्रचंड तणावाखाली आले होते.हातापाया पडत होते,मला कृपया जाऊ द्या,अशी विनवणी करताना चॅनेलवर पहायला मिळाले.आता ते विनोद तावडे देखील ” मी नाही त्यातली,कडी लावा आतली,” अशा पद्धतीने वागत आहेत.तावडे आता म्हणत आहेत की मी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येथे आलो होतो,पण त्यांनी आचारसंहितेचा अमल सुरू असताना बैठक कशी घेतली ? या प्रश्नाचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले पाहिजे.भाजपच्या या नेत्याने सोबत ५ कोटी रु.आणले,असे भाजपच्या काही लोकांनी आ.हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांसमोर सांगितले.मग निवडणूक अधिकारी,भरारी पथकातील कर्मचारी व पोलिस मंडळी झोपा काढत होते का ? सर्वसामान्य नागरिकांच्या दुचाकीची तपासणी करणारे अधिकारी व पोलिस कंटेनर्स तपासणी केल्याशिवाय कसे काय सोडतात ? कालच्या प्रकरणात भरारी पथकातील निवडणूक अधिकारी व पोलिसांवरही गुन्हे दाखल होण्याची गरज आहे.
भाजप नेते आता कितीही इंकार करत असले तरी या घटनेने त्यांना उघडे पाडले आहे.त्यांना निवडणूक आयोगाचे अधिकारी व पोलीस धडा शिकवू शकणार नाहीत.अशा लोकांना मतदारांनी त्यांची जागा दाखवून देण्याची गरज आहे.
वसईचे लोकप्रिय आ.हितेंद्र ठाकूर व युवा आ.क्षितिज ठाकूर यांचाआपण निवडणुकीत पराभव करू शकत नाही,म्हणून भाजपने हा फंडा वापरला,पण आ.ठाकूर यांच्या लढवय्या फौजेने त्यांना उघडे नागडे पाडले.
कालच्या घटनेने आम्हा नागरिकांच्या माना शरमेने खाली गेल्या असून या घटनेचे समर्थन करणाऱ्या नेत्यांची कींव करावीशी वाटते.निवडणूक आयोग,लोकशाही व्यवस्थेतील प्रक्रियेला ” लोकशाहीचा उत्सव,” असे गोंडस नाव देते.” हा डाग चांगला आहे,” ” संविधानाने दिलेला हा अधिकार आहे,तो प्रत्येकाने बजवावा,” असे बॅनर्स व होर्डिंग्ज लावते.पण महायुतीचे नेते मात्र त्यांच्या या आवाहनाची सतत चिरफाड करत असतात.निवडणूक आयोग ही आता स्वायत्त संस्था राहिलेली नाही,ती सत्ताधाऱ्यांची बटिक झाली आहे.निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त टी.के.शेषन यांनी आपल्या कार्यकाळात असलेल्या अधिकारांचे काटेकोरपणे वापर केला.त्यांनी राजकारण्याच्या बेधुंद वागण्याला आचारसंहितेच्या माध्यमातून पायबंद घातला.आज त्या चौकटीची तोडमोड करण्यात भाजप धन्यता मानत आहे.त्यामुळे शेषन हे स्वर्गात नक्कीच धायमोकलून रडत असतील.
मित्रानो,भाजपला राज्यातील प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत.भारतीय संघराज्यात प्रादेशिक पक्षाचे वाढते वर्चस्व त्यांना मान्य नाही.आजवर त्यांनी ज्या ज्या राज्यात प्रादेशिक पक्षाशी युती केली,त्या प्रादेशिक पक्षांना त्यांनी संपवून टाकले.त्यासाठी ते साम,दाम,दंड,भेद या नीतीचा ते बेमालूमपणे वापर करत असतात.घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ज्या समितीने भारतीय संविधानाची निर्मिती केली,त्या संविधानाची मोडतोड करण्यासाठी ते आसुसलेले आहेत.त्यासाठी त्यांनी देशभरात ” पैसा फेको और तमाशा देखो,” हे नाट्य सुरू केले आहे.काल विरार येथे जे काही घडले,हा देखील त्याचाच एक भाग होता.या अशा देशविघातक कामी त्यांना देशातील मोठे उद्योगपती आर्थिक मदत करत असतात,त्यांना देखील भारतात लोकशाही व्यवस्था मान्य नाही,ही सारी मंडळी सरंजामशाही व्यवस्थेचे पुरस्कर्ते आहे.” एक देश,एक निवडणूक,समान नागरी कायदा,नागरिकत्व सुधारणा कायदा ( सीएए ) हे कायदे अमलात आणण्यासाठी ते धडपडत आहेत.पण अठरापगड जाती धर्माचा समावेश असलेला १५० कोटी लोकसंख्येचा हा देश,त्यांना अपेक्षित असलेली व्यवस्था कधीही मान्य करणार नाही.असो पण या निवडणुकीत मतदारांनी अत्यंत डोळसपणे व या लोकांच्या आमिषाला बळी न पडता मतदान केले पाहिजे. अन्यथा आपल्या देशाची स्थितीही श्रीलंका,म्यानमार,पाकिस्तान, बांगला देश,सिरिया,इराक यांच्यासारखी होईल.जागृत रहा आणि सजग राहून आज मतदान करा.

