दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
भारतीय समाज सहिष्णू आहे,येथे ” व्होट जिहाद व बटेंगे तो कटेंगे,” या समाज विघातक धोषणाना येथे थारा मिळत नाही,
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने विविध हातखंडे वापरण्याचा प्रयत्न केला,पण ते आपल्यावरच उलटतील,हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ते थांबवले.चला बघुया,त्यांनी कोणते मुद्दे प्रचाराच्या बाजारात आणण्याचा प्रयत्न केला व त्यांना माघार घ्यावी लागली.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सुपीक डोक्यातून ” व्होट जिहाद व बटेंगे तो कटेंगे,” हे दोन मुद्दे बाहेर आले व राज्यात सत्तेसाठी हपापलेले भाजपच्या स्थानिक नेत्यांनी या मुद्द्यावर प्रचारास सुरुवात केली.पण पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा या दोघांच्या लक्षात आले कि हे दोन्ही विषय आपल्या अंगलट येणारे आहेत.त्यामुळे मोदी यांनी या घोषणेला मूठमाती देत ” एक है,तो सेफ है,” अशी घोषणा दिली.
वास्तविक भारतीय समाज हा सहिष्णू समाज आहे.तो सहिष्णू वृत्तीला विशेष महत्व देतो.सहिष्णुता ही सामाजिक सलोख्याची पहिली पायरी आहे.समाजात शांतता,विविध जातीधर्मात एकात्मता राहण्यासाठी सहिष्णुता खूप गरजेची आहे.अशा या सहिष्णू भारतीय समाजात ” व्होट जिहाद व बटेंगे तो कटेंगे,” कधीही थारा मिळाला नाही व पुढेही तो मिळणार नाही.त्यामुळे भाजपाच्या या विघातक घोषणेचे रूपांतर मोदी व शहा या जोडगोळीने ” एक रहेंगे,तो सेफ रहेंगे,” असे केले.भारत हा विविधतेने नटलेला देश आहे,विविध धर्म,पंथ व विविध परंपरा व भिन्न रीतिरिवाज पाळणारे नागरिक राहतात.प्रत्येकाची संस्कृती,विचार व जीवनशैली वेगवेगळी आहे.तरीही त्यांनी राष्ट्रीय एकात्मता जोपासली आहे.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आपला हिंदू धर्म सोडून इतर सर्व धर्माकडे तुच्छ भावनेने पाहतात.त्यामुळे त्यांच्या डोक्यातून अशा समाज विघातक घोषवाक्ये बाहेर पडत असतात,पण गेल्या लोकसभा निवडणुकीत याच सहिष्णू असलेल्या भारतीय मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्यामुळे भाजपचे केंद्रीय नेते आता ताक देखील फुंकून पिऊ लागले आहेत.

