दीपक मोहिते,
” फ्रंटलाईन,”
विधानसभा निवडणुका ; महविकास आघाडी बाजी मारण्याची शक्यता,
निवडणुकीत उभे असलेल्या हजारो उमेदवारांचे भवितव्य उद्या ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे.मतदारराजा या निवडणुकीत आपला कौल कसा देतो ? याकडे तमाम देशवासियांचे लक्ष लागले आहे.दैदिप्यमान इतिहास असलेले पुरोगामी राज्य व आर्थिक राजधानी असलेली मुंबई,आपल्या ताब्यात राहावी,यासाठी देव पाण्यात टाकून बसलेल्या केंद्रीय नेतृत्वाचे मनसुबे तडीस जातील का ? या प्रश्नाचे उत्तर २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीतून मिळणार आहे.
उद्या राज्यातील ९ कोटी मतदार एकूण २८८ लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान करतील.राज्यातील एकंदरीत राजकीय वातावरण लक्षात घेता या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.महायुती व महाविकास आघाडी,या दोघांनी या निवडणुकीत आपले सर्वस्व पणाला लावले.महायुतीने जमिनी प्रचारावर भर न देता डिजिटल प्रचारावर सर्वाधिक भर दिला.तर शरद पवार,राहुल गांधी,प्रियांका गांधी व उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात जाहीर सभांचा धूमधडाका उडवून दिला.त्यांच्या प्रत्येक जाहीर सभेला प्रचंड जनसमुदाय लोटला.उद्धव ठाकरे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीतील प्रचाराप्रमाणे या निवडणुकीच्या प्रचारातही ” गद्दार,पक्ष,चिन्ह व माझा बाप चोरणारे,” या चार शब्दाचा बेमालूमपणे वापर करत एकनाथ शिंदे यांची ” पळता भुई थोडी,” केली.तर शरद पवार यांनी अजित पवार यांना बारामतीच्या बाहेर पडू दिले नाही.विशेष म्हणजे पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार या देखील युगेंद्र पवार या आपल्या नातवासाठी वयाच्या ८० वर्षी घराबाहेर पडल्या व घरोघरी जावून त्यांनी बारामतीकरांच्या भेटी घेतल्या.भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या जाहीर सभा झाल्या,पण त्यांच्या जाहीर सभाना लोकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे हे दोघेही प्रचाराच्या अंतिम टप्यात शेवटचे चार दिवस राज्यात फिरकले नाहीत.त्याचवेळी राहुल गांधी व प्रियांका गांधी या दोघांच्या जाहीर सभा दणक्यात झाल्या.महागाई,उद्योगपतींना झुकते माप,उद्योगपतीना १६ लाख कोटींची कर्जमाफी,शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणे,शेतमालाला हमीभाव न देणे,इ.प्रश्नावर या दोघा भाऊबहिणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलेच घेरले.आता प्रचाराच्या साऱ्या तोफा थंडावल्या असून आजचा दिवस हा एक्झिट पोल,महाचर्चा व निवडणूक विशेष कार्यक्रमांनी गाजणार आहे.दरम्यान काही संस्थांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत.त्यांच्या अंदाजानुसार महविकास आघाडीला १४२ ते १५७ तर महायुतीला १०९ ते ११५ जागा मिळतील,या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षात मोठ्याप्रमाणात बंडखोरी झाल्यामुळे निवडून येणाऱ्या बंडखोर उमेदवारांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल,असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

