दीपक मोहिते,
” रणसंग्राम,”
कुडाळ विधानसभा ; आ.वैभव नाईक यांचे पारडे जड,
कुडाळ विधानसभा मतदारसंघात वैभव नाईक व निलेश राणे,या दोघांमध्ये होणारी लढत केवळ मतदारसंघापुरता मर्यादित राहणार नसून त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरही होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ विधानसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेचे ( उद्धव ठाकरे ) विद्यमान आ.वैभव नाईक विरुद्ध निवडणूक लढण्यासाठी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले राणे पुत्र निलेश राणे या दोघांमध्ये चुरशीची लढत होत आहे. मतदारसंघातील वातावरण लक्षात घेता वैभव नाईक यांचे पारडे जड आहे.शिवसेनेचा बालेकिल्ला,” अशी या मतदारसंघाची ओळख आहे.मात्र शिवसेनेत फूट पडल्याने पक्षाची ताकद विभागली गेली आहे.हे जरी खरं असलं तरी स्थानिक जनतेवर नाईक यांचा चांगला प्रभाव आहे.या निवडणुकीत मतदारसंघावर वर्चस्व ठेवण्यासाठी शिवसेनेचे दोन गट एकमेकांना भिडणार आहेत,पण एकनाथ शिंदे गटाला वैभव नाईक यांना रोखणे शक्य होणार नाही.या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांना या मतदारसंघातील जनतेची प्रचंड सहानुभूती आहे,त्याचा फायदा वैभव नाईक यांना होणार आहे.तर दुसरीकडे निलेश राणे यांचा अतिरेकी स्वभाव,शिंदे गटाची नगण्य ताकद व गेल्या काही वर्षात राणे पितापुत्राकडून झालेले शत्रूत्वाचे राजकारण इ.कारणे निलेश राणे यांच्या पराभवाला हातभार लावणारी आहेत.
या मतदारसंघात एकूण पाच उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी प्रमुख लढत ही वैभव नाईक आणि निलेश राणे यांच्यामध्ये होणार आहे.महायुतीच्या जागा वाटपात कुडाळ मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आला.मात्र पक्षाकडे सक्षम उमेदवार नसल्याने भाजपच्या निलेश राणे यांना शिवसेनेत घेऊन उमेदवारी देण्यात आली आहे.पण ही निवडणूक जिंकणे निलेश राणे यांना शक्य होणार नाही.या निवडणुकीत निलेश राणे यांचा पराभव झाल्यास त्यांच्या राजकारणाची इतिश्री होण्याची शक्यता आहे.निलेश राणे व त्यांचे कुटुंब यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.वैभव नाईक हे तिसऱ्यांदा निवडून आले तर कोकणात शिवसेना पुन्हा आपले पाय घट्ट रोवेल.तसेच नाईक यांचे स्थानही अधिक मजबूत होणार आहे.

