दीपक मोहिते,
रणसंग्राम,
आज संध्या.प्रचार थंडावणार,उमेदवारांची जीवाची घालमेल सुरू,
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ च्या मतदानाला अवघे ४८ तास उरले आहेत.आज संध्या.५.०० वाजता या निवडणुकीचा प्रचार थंडावणार आहे.गेले १४ दिवस उमेदवारांनी जोरदार प्रचार केला.पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक उमेदवाराने या निवडणुकीच्या प्रचारात मतदारांची प्रत्यक्ष भेट घेणे,चौक सभा,बाईक रॅली,पदयात्रा,यावर भर दिला.भाजप एकमेव पक्षाचा अपवाद वगळता इतर राजकीय पक्षांनी जाहीर सभा घेतल्या नाहीत.केंद्रीय मंत्री राजनाथसिंह काल येऊन गेले.
आज प्रचार बंद होणार असला तरी छुपा प्रचार मात्र सुरूच राहणार आहे,तसेच आज व उद्या अशा दोन रात्री ” रात्रीचा खेळ चाले,” हे नाट्य जोमात रंगण्याची शक्यता आहे.गेल्या काही दिवसात जिल्ह्याच्या अनेक भागात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रु.पकडले.या रकमा कोणाच्या होत्या,हे मात्र उघड करण्यात आले नाही.त्यामुळे निवडणूक अधिकारी व पोलीस देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.पैसे वाटप व धार्मिक आवाहन करून मतदारांना आकर्षित करणे,हे संविधानाने गुन्हा असल्याचे स्पष्ट केले असताना,आजवर या गुन्ह्यातील एकाही आरोपीला शिक्षा झालेली नाही.त्यामुळे निवडणूक अधिकारी व पोलीस,या जा कारवाया करत असतात,त्या तकलादू स्वरूपाच्या असतात,असे मतदारांचे म्हणणे आहे.
या निवडणुकीच्या प्रचारात काही किरकोळ अपवाद वगळता एकाही पक्षाने लोकांचे प्रश्न,त्यांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या,पाणी,आरोग्य,शिक्षण,रस्ते,वैद्यकीय सेवा,महागाई,त्रस्त शेतकरी,बेरोजगारी इ.ज्वलंत विषय हाताळले नाहीत.केवळ एकमेकांच्या उखाळ्या – पाखाळ्या,हेवेदावे,लफडी व कुलंगडी,आर्थिक गैरव्यवहार,यावर आपल्या प्रचाराचा भर ठेवला.त्यामुळे मतदारांमध्ये या निवडणुकीविषयी फारसा उत्साह पाहायला मिळाला नाही.दर पाच वर्षांनी येणारा हा उत्सव असल्याची भावना दिवसेंदिवस बळावत चालली आहे.सरकार मात्र या प्रक्रियेला ” लोकशाहीचा उत्सव,” असे गोंडस नाव देऊन मतदारांना आवाहन करत असते.मात्र गेल्या अनेक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी मात्र पाऊणशेचा पल्ला गाठू शकली नाही.मतदानाची टक्केवारी ही कमाल ६१ ते ६५ टक्के दरम्यान राहिली.सुमारे ३९ टक्के मतदार आपल्या मताचा अधिकार का वापर करत नाहीत,याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा.केंद्रीय निवडणूक आयोग,मतदारांना विविध सोयी – सवलती देत असते तरीही मतदानाची टक्केवारी वाढत नाही,या मागची कारणे काय आहेत,हे शोधून काढण्याची गरज आहे.

